पाटणा :दुरंतो एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांच्या डीआरआयच्या पथकाने मुसक्या आवळल्या. या तस्करांकडून 7 कोटी 72 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. हावडा ते नवी दिल्ली रेल्वे क्रमांक 12273 या दुरंतो एक्सप्रेसमधून ही सोन्याची तस्करी करण्यात येत होती. प्रेमल राडिया आणि अनिल कुमार असे डीआरआयने पकडलेल्या दोन तस्करांची नावे आहेत.
पाटणा स्टेशनवर करण्यात आली कारवाई :डीआरआयच्या पथकाने मोठ्या कारवाईत पाटणा जंक्शनवर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. रेल्वे क्रमांक 12273 हावडा नवी दिल्ली दुरंतो एक्स्प्रेसमधून सोन्याची बिस्किटे दिल्लीकडे घेऊन जात असताना पाटणा जंक्शनवर ढीआरआयच्या पथकाने 42, 43 क्रमांकाच्या सीटवर B7 कोचमध्ये प्रवास करणाऱ्या दोघांना अडवून त्यांची झाडाझडती घेतली. यावेळी प्रेमल राडिया आणि अनिल कुमार यांच्या कमरेतून 12 किलो 600 ग्रॅम सोन्याचे बिस्किट आढळून आले. दोघांनी कमरेला बेल्ट बांधून सोन्याचे बिस्किट लपवले होते. या छाप्यात डीआरआय आणि आरपीएफच्या पथकाने मोठ्या तत्परतेने सोने तस्करांना जेरबंद केले आहे.