पणजी : स्व. मनोहर पर्रीकर हे माजी केंद्रीय मंत्री आणि तब्बल चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री ( Ex CM Manohar Parrikar ) राहिलेले आहेत. २०१९ साली त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर ( Utpal Parrikar ) यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र भाजपने त्यांना तिकीट नाकारले. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवत भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. 1994 पासून ते 2019 पर्यंत म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत मनोहर पर्रिकर यांनी पणजी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले, तेथेच उत्पल यांनी विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) लढवली आहे. त्यामुळे भाजपनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.
ब्राह्मण, ख्रिश्चन समाजाचा पाठिंबा मिळणार का?
या निवडणुकीत त्यांनी मनोहर पर्रीकरांचा राजकीय वारस म्हणून जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न केला. अपक्ष निवडणूक लढवत असल्याने त्यांना “माईक” हे मतदान चिन्ह मिळाले होते. या निवडणुकीत त्यांना त्यांच्या गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचा पाठिंबा मिळू शकतो. पाच वेळा पणजीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनोहर पर्रिकर यांना नेहमीच पाठिंबा दिला होता. याशिवाय अनेक ख्रिश्चन उच्चभ्रू देखील उत्पल यांच्या बाजूने उभे राहिले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपची प्रतिष्ठा पणाला
देशाचे लक्ष असलेल्या पणजी विधानसभा निवडणुकीत उत्पल यांच्या उमेदवारीमुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या वतीने बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे, नाराज उत्पल पर्रीकर यांनी त्यांच्या विरोधात जोरदार लढत दिली आहे. शिवसेनेही उत्पल यांच्या विरोधात उमेदवार न देता त्यांना पाठिंबा दिला आहे. या शिवाय अनेक संघटनांनी उत्पलला उघड आणि छुपा पाठिंबा दिल्यामुळे या निवडीवर सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.