देहारडून - उत्तराखंडमधील जोशीमठ येथे हिमकडा कोसळून नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. हिमनदी फुटल्याने डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाण्यासह दगड मातीचा लोंढा खाली आला. यात १५० जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून बचावकार्य सुरू आहे.
धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याच्या लोढ्यांने उर्जा प्रकल्पाचे दरवाजे तुटून पाण्यात वाहून गेले. नदी मार्गावरील छोटे मोठे पुलही वाहून गेले आहेत.तसेच इतरही बांधकाम पुरात वाहून गेले. अनेक जण या पुरात अडकले असून राज्य आणि राष्ट्रीय आपत्तीनिवारण पथक घटनास्थळी मदत करत आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी घटनास्थळी भेट घेवून परिस्थितीचा आढावा घेतला.प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
मदत आणि बचावकार्य सुरू -
चमोली जिल्ह्यातील जोशीमठ येथील बद्रीनाथ मार्गावर ही घटना घडली. नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी स्वाती भदौरिया घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आपत्ती निवारण पथकेही रवाना झाली आहेत. या घटनेत नक्की किती जिवितहानी झाली याची माहिती मिळाली नाही. घटनास्थळाजवळील नागरिकांनी या पूराचा व्हिडिओ काढला असून यामध्ये पुराचे तांडव दिसत आहे.