महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाकिस्तानातून परतलेली गीता कुटुंबाच्या शोधात बासरमध्ये दाखल; 'ई टीव्ही भारत' सोबतीला - The search for Geeta's family continues

तब्बल वीस वर्षे पाकिस्तानात राहिलेल्या मूकबधीर गीताच्या कुटुंबीयांचा शोध पाच वर्षांपासून घेतला जात आहे. यासाठी इंदुरच्या एका स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते गीतासह नांदेडमध्ये आले होते. गीता आपल्या गावाचे, घराचे ज्या प्रकारे वर्णन करते त्यानुसार हे गाव नांदेड जिल्हा किंवा शेजारच्या तेलंगणा राज्याच्या सीमेवरील गाव असू शकते. नांदेडमधून निघालेली गीता आता तेलंगणातील बासरमध्ये दाखल झाली आहे.

'Gita' returns from Pakistan In Nanded
गीता नांदेडमध्ये

By

Published : Dec 15, 2020, 12:20 PM IST

Updated : Dec 16, 2020, 12:05 AM IST

बासर (तेलंगणा) - पाकिस्तानातून आपल्या कुटुबीयांचा शोध घेण्यासाठी आलेली मूकबधीर गीता आता तेलंगणा राज्यातील बासरमध्ये पोहोचली आहे. आपले घर रेल्वे स्थानकाच्या बाजूला, मंदिर आणि नदीच्या आसपास असल्याचे तिचे म्हणणे आहे. तसेच शेतामध्ये ऊस आणि भुईमुगाचे पिक असल्याचे वर्णन तिने केले होते.

गीता कुटुंबाच्या शोधात तेलंगाणाच्या बासरमध्ये दाखल
  • बासरच्या तहसीलदार आणि पोलिसांनी गीताची केली चौकशी

तिच्या या वर्णानानुसार हे गाव बासर असू शकते. यामुळे तिच्या कुटुबीयांना शोधण्यासाठी इंदुरच्या आनंद सर्व्हीस सोसायटीच्या कार्यकर्त्यांची टीम गीतासोबत पोहोचली आहे. तेलंगणातील बासरमध्ये पोहोचताच बासरचे तहसीलदार आणि पोलीस अधिकारी यांनी गीतासोबत चर्चा केली. बासरचे पोलीस स्टेशन प्रमुख परमदीप यांनीही तिच्याशी चर्चा केली आहे.

नांदेड- जवळपास वीस वर्षांपूर्वी हरवलेली गीता पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानातून भारतात परतली आहे. ती आपल्या जन्मदात्याच्या शोधात नांदेडमध्ये दाखल झाली असून नांदेड जिल्हा किंवा शेजारच्या तेलंगणा राज्यात तिचे कुटुंब असावे असा अंदाज आहे. मूकबधीर असलेल्या गीताच्या मदतीसाठी राज्यस्तरीय कर्णबधिर संस्था आणि स्थानिक पोलीस तिच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.

गीताच्या कुटुंबाचा शोध सुरू

गीताने आपल्या भाषेत परिवाराला शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

  • इंदुर येथील आनंद सर्व्हीस सोसायटी करतेय मदत

या गीताला पाच वर्षांपूर्वी तत्कालीन विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी भारतात आणले होते. गेल्या पाच वर्षांपासून तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यात येत आहे. इंदुर येथील आनंद सर्व्हीस सोसायटीकडे चार महिन्यापूर्वी सांभाळण्याची व परिवार शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • गुरुद्वाराचे दर्शन घेऊन धर्माबादकडे रवाना

सोमवारी सचखंड एक्सप्रेसने गीता नांदेड येथे आली आहे. रात्रीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.डी. भारती यांनी गीताला व संबंधित संस्थेला मदत केली. राहण्याची व वाहनाची व्यवस्था करून दिली. मंगळवारी सकाळी सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेऊन गीता तेलंगणाच्या सीमेवरील धर्माबादकडे रवाना झाली आहे. सदरील परिसरात तिचे कुटुंब शोधण्यासाठी फिरत आहेत.

हेही वाचा- पाकिस्तानमधून परतलेल्या गीताच्या कुटुंबीयांच्या शोधात केंद्राचे पथक मराठवाड्यात

इंदुर/औरंगाबाद/नांदेड - जवळपास पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या दौऱ्यावर निघाली आहे. दोन दशकांपूर्वी कुटुंबापासून ताटातूट झाल्याने लहानपणीच गीता चुकीने थेट पाकिस्तानात पोहोचली होती. यानंतर २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे गीता भारतात परतली होती.

  • इंदौरमधील आनंद सेवा सोसायटीवर गीताचे कुटुंब शोधण्याची जबाबदारी

मध्य प्रदेशच्या सामाजिक न्याय आणि दिव्यांग लोककल्याण विभागाच्या एका अधिकाऱ्यानुसार, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या इंदौरमधील आनंद सेवा सोसायटीकडून गीताची काळजी घेतली जाते. या स्वयंसेवी संस्थेवरचा गीताच्या आई वडिलांना शोधण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

कुटुंबाला शोधण्यासाठी गीता नांदेडमध्ये

  • मराठवाडा आणि तेलंगाणाच्या भागात गीताचे कुटुंब असण्याची शक्यता

३० वर्षीय गीताने इशाऱ्याद्वारे आपण राहत असलेल्या भागांसंबंधी काही संकेत दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या परिसरात तिचे घर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांचा माग काढत आम्ही तिचे कुटुंब शोधण्यासाठी रविवारपासून महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या दौऱ्यावर निघालो असल्याचे सांकेतिक भाषा तज्ज्ञ ज्ञानेंद्र पुरोहित यांनी सांगितले आहे. सध्या आम्ही मराठवाड्यात असून, पुढील सात दिवसांत आम्ही महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या सीमावर्ती भागांमध्ये गीताच्या कुटुंबाचा शोध घेणार असल्याचे पुरोहित यांनी सांगितले. या प्रवासात ज्ञानेंद्र पुरोहित हे गीतासोबतच आहेत.

  • गीताचे हावभाव आणि इशाऱयावरून तिच्या कुटुंबाचा घेतला जातोय शोध

अधिकाऱयांनी सांगितले की, गीताच्या नाकाला उजवीकडे छिद्र केले आहे. त्यानुसार मूकबधीर महिलांच्या मते तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावीत. दरम्यान, गीता ही तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची प्रशंसक आहे. गीताच्या हावभावानुसार तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात.

कुटुंबाला शोधण्यासाठी गीता नांदेडमध्ये

तसेच लहानपणीच्या पुसट आठवणींद्वारे गीताने आपल्या गावाजवळ एक रेल्वे स्थानक आणि गावातील नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार सुरुवातीला गीताला नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील रेल्वे स्थानक असणाऱ्या परिसरात आणले जाणार आहे. यानंतर तेलंगाणाच्या सीमाभागात गीताच्या कुटुंबाचा शोध घेतला जाणार आहे. आठवडाभराचा हा दौरा रेल्वे आणि रस्ते मार्गाने होणार आहे. या दौऱ्यात मध्यप्रदेश महिला पोलिसांची एक तुकडी गीता सोबत असणार आहे. शिवाय प्रवासामध्ये स्थानिक पोलिसांची देखील मदत घेतली जाणार आहे.

  • 5 वर्षात गीता आमची असल्याचा 20 कुटुंबांचा दावा -

गेल्या पाच वर्षांत देशाच्या विविध भागातील सुमारे वीस कुटुंबांनी गीताला त्यांची हरवलेली मुलगी असल्याचे सांगितले होते. मात्र, यातील एकाही कुटूंबाचा गीतावर असलेला दावा तपासात सिद्ध होऊ शकलेला नाही.

कुटुंबाला शोधण्यासाठी गीता नांदेडमध्ये

  • महाराष्ट्र पोलीस मदतीला -

गीताचे कुटुंब शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलीसही मदतीला आले आहेत. औरंगाबादमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी सांगितले की, मागील 20 वर्षापासून मराठवाडा परिसरातून हरवलेल्या मूकबधीर मुलींचा रेकोर्ड तपासण्यात येत आहे. यामुळे गीताच्या कुटुंबांना शोधण्यासाठी मदत होईल, असे किरण पाटील यांनी सांगितले आहे.

  • काय आहे प्रकरण -

गीता सध्या ३० वर्षे वयाची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सुमारे २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वे स्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये बसलेली आढळली होती.

देशाच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ती 26 ऑक्टोबर 2015 रोजी भारतात परत आली होती. त्यानंतर ती इंदौरमधील स्वयंसेवी संस्थेत वास्तव्य करत आहे व आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत देशाच्या विविध भागांत फिरत आहे.

  • कुटुंबाला शोधण्यासाठी गीता नांदेडमध्ये

पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात महाराष्ट्र आणि तेलंगाणाच्या दौऱ्यावर निघाली आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यात गीताच्या कुटुंबाचा शोध घेण्यात येत आहे.

नांदेडचे प्रतिनिधी नागोराव भांगे यांनी घेतलेला आढावा

गीताने इशाऱ्याद्वारे आपण राहत असलेल्या भागांसंबंधी काही संकेत दिले आहेत. तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावीत. तसेच तिच्या घराजवळ रेल्वे स्थानक आणि एक मंदिर असल्याचे तिच्या काही इशाऱ्यावरून लक्षात आले आहे.

त्यामुळे गीताचे कुटुंब हे नांदेड किंवा शेजारील तेलंगाणा परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे गीताच्या कुटुंबाच्या शोधात एक पथक आज नांदेडमध्ये आले आहे. गीताला तिच्या परिवाराचा शोध घेण्यासाठी इंदौर येथील ज्ञानेंद्र पुरोहित, सुमित्रा मुवेल, जालना येथील राज्यस्तरीय कर्णबधीर संस्थेचे मनोज पटवारी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. भारती हे परिश्रम घेत आहेत.

  • औरंगाबादेत गीतासह पथकाने केली पाहणी

गीताला घेऊन केंद्राचे पथक औरंगाबादेत दाखल झाले. त्यांनी रेल्वेस्टेशन परिसर गीताला दाखवला. मात्र हा परिसर परिचित नसल्याचं गीताने सांगितल्यावर लासूर स्टेशनसह इतर परिसर गीताला दाखवण्यात आला. रेल्वे सेनेचे संतोषकुमार सोमाणी यांची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने गीताचा फोटो आणि माहितीच्या आधारे गीताच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. औरंगाबादनंतर जालना रेल्वेस्टेशन आणि परिसर गीताला दाखवण्यात आला. यावेळी औरंगाबाद शहर - ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस आणि रेल्वेसेनेने पथकाला मदत केली.

  • गीताच्या माहितीनुसार होत आहे तपास

गीताने सांगितल्याप्रमाणे तिच्या गावाजवळ रेल्वे स्टेशन, नदी आणि एक देवीचे मंदिर आहे. असे ठिकाण लासूर स्टेशनजवळ असल्याचे संकेत होते. त्यामुळे लासुर स्टेशन परिसरात या पथकाने गीतासोबत जाऊन भेट दिली. रेल्वे पटरी आणि नदीकाठचा परिसर त्यांनी पाहिला. त्यानंतर दाक्षायणी देवी मंदिरात ते पोहोचले मात्र गीताला हा परिसर आठवला नाही. त्यामुळे त्यांनी तिथून आपला पुढचा प्रवास सुरु केला.

नांदेड - धर्माबाद - बासर - निजामाबाद - सिकंदराबाद आणि नंतर सिकंदराबाद - परळी - औरंगाबाद असा प्रवास करण्यात येणार आहे. गीताच्या परिचयाचे स्टेशन वाटले की तिथे शोध घेतला जाणार आहे. चित्रकारांकडून तिच्या बालपणीचा फोटो काढला जाणार आहे. तसेच गृहमंत्रालयाकडून तिची संपूर्ण माहिती मागवून त्यातील शिफारसीवरून पुढील मोहीम हाती घेतली जाणार आहे. पुढील काही दिवसात गीताच्या कुटुंबीयांबाबत काहीतरी माहिती मिळेल, अशी माहिती रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमानी यांनी दिली आहे.

Last Updated : Dec 16, 2020, 12:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details