कोलकाता -भाजपाला रामराम ठोकत मुकुल रॉय यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये टीएमसी सोडत भाजपाचे कमळ त्यांनी हाती घेतले. आता तब्बल चार वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘घर का लडका घर वापस आया' अशी प्रतिक्रिया दिली. तसेच आता तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांची काय भूमिका राहील, हेही ममतांनी स्पष्ट केले.
रॉय यांनी टीएमसीत प्रवेश केल्यानंतर ‘घर का लडका घर वापस आया है,’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली. मुकुल यांची घरवापसी झाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यानही मुकुल रॉय विरोधात बोलले नाहीत. त्यांच्यासोबत कधीही मतभेद नव्हते, असे ममता म्हणाल्या. मुकुल रॉय यांना भाजपामध्ये धमक्या येत असत, ज्याचा त्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम झाला, असे ममतांनी सांगितले. तसेच रॉय यांची आता तृणमूलमध्ये असलेली भूमिका ममतांनी स्पष्ट केली. मुकुल रॉय यांनी यापूर्वी महत्वाची भूमिका साकारली आहे. भविष्यातही तीच भूमिका राहील. तृणमूल एक कुटुंब आहे, असे ममता म्हणाल्या.
भाजपाला धक्का...
काही दिवसांपूर्वी तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सौगत रॉय यांनीही मुकुल रॉय पक्षात दाखल होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. कोरोनाची लागण झालेल्या मुकुल रॉय आणि त्यांची पत्नी कृष्णा रॉय यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फोनवरून विचारपूस केली होती. आता मुकुल रॉय यांचा पक्षबदलाचा निर्णय भाजपाला मात्र मोठा धक्कादायक ठरला आहे. मुकुल रॉय यांच्यामुळेच भाजपाला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये 18 जागा मिळवण्यात यश आले होते.