लखनौ :जगप्रसिद्ध डॉक्टर आणि प्रोफेसर एन. जॉन कॅम यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दंगल रोखण्याच्या मॉडेलचे कौतुक केले आहे. तसेच फ्रान्समधील दंगल थांबवण्यासाठी योगी यांच्या मॉडेलचा अवलंब करायला हवा, असे ट्विट देखील त्यांनी केले आहे. योगी आदित्यनाथ यांना भारतातून फ्रान्सला पाठवावे, जेणेकरून ते 24 तासांत येथील दंगल थांबवू शकतील, असे ट्विट त्यांनी केले आहे. याला उत्तर देत योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, 'आज संपूर्ण जग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मॉडेलचे कौतुक करत आहे'.
योगींच्या बुलडोझर मॉडेलची चर्चा : जर्मन प्राध्यापक एन. जॉनचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगल रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. विशेषत: दंगलखोरांकडून वसुली करणे आणि बुलडोझर मॉडेलची चर्चा सुरू आहे. प्राध्यापक एन. जॉनच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून अधिकृत ट्विट करण्यात आले आहे. ट्विट मध्ये म्हटले आहे की, 'जेव्हा जेव्हा अतिरेकी जगाच्या कोणत्याही भागात दंगली, अराजकता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करतात तेव्हा जगात शांतता आणि परिवर्तनाची मागणी होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे योगी मॉडेल तयार केले आहे'.