लुधियाना : गॅस लिक झाल्यामुळे एक गर्भवती महिला बेशुद्ध पडल्याने खळबळ उडाली. ही घटना पंजाबमधील लुधियाना येथे घडली आहे. आज सकाळी ही गर्भवती महिला बेशुद्ध पडल्याने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला बेशुद्ध पडल्याने परिसरात पुन्हा गॅस लिक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. परिसराची पाहणी करण्यात आली, मात्र एसडीएम हरजिंदर सिंह यांनी गॅस गळती झाल्याचे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगितले आहे.
गरोदर असल्याने महिला अशक्त :बेशुद्ध होऊन पडलेली महिला ही चार महिन्यांची गरोदर आहे. त्यामुळे गरोदर असल्याने पीडित महिला अगोदरच अशक्त आहे. त्यामुळे कधीकधी गर्भवती महिलांना चक्कर येत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गरोदर महिलांना उलट्या होतात, त्यामुळे अशक्तपणा येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, आम्ही घटनास्थळी उपस्थित आहोत, असे ते म्हणाले.