अक्षय पोकळे - सध्या खासगी शाळांमध्ये मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. लाखो रुपये फी देऊन पालक खासगी शाळांना प्राधान्य देतात. शासकीय शाळांमध्ये सुविधा आणि शिक्षणाचा दर्जा चांगला नसल्याचा गैरसमज म्हणा पण पालकांमध्ये दिसून येतो. मात्र, ओडिशा राज्यातला गंजाम जिल्हा याला अपवाद आहे. या जिल्ह्यात School Transformation अर्थात शाळांचा कायापालट करण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, येथील मराठमोळे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प सुरू आहे. तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राज्यात राबवण्यात येत आहे. या विषयावर 'ई टीव्ही भारत'चे प्रतिनिधी अक्षय पोकळे (Akshay Pokale) यांनी जिल्हाधिकारी विजय कुलांगे (Vijay Kulange) यांच्यासोबत संवाद साधला.
- शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन -
Teamwork, Transparency, Technology, Transformation आणि Time या '5T' तत्वांवर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पायाभूत सुविधा उप्लब्ध करून देत शाळांचा कायापालट या प्रकल्पांतर्गत केला जातो. पहिल्या टप्प्यात गंजाम जिल्ह्यातील 50 शाळांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. याचे थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून परीक्षण केले जाते. गंजाममधील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन या प्रकल्पाला रुप दिले आहे. यामध्ये सरपंच, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, स्कूल मॅनेजमेट समितीचे सर्व सदस्य या सर्वांनी सक्रीय योगदान दिले असल्याचे जिल्हाधिकारी विजय कुलांगे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन हे उद्देश ठेऊन मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये पोहचवण्याचे ध्येय असल्याचे विजय कुलांगे यांनी बोलून दाखवले.
या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात 50 शाळांचा यशस्वी कायापालट करण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील 83 शाळांचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. तसेच पुढील काही महिन्यात तिसऱ्या टप्पामध्ये 233 शाळांचा कायापालट करण्यात येणार आहे. शिक्षणातून परिवर्तन आणि मुलांमध्ये सक्षमीकरण हा उद्देश ठेऊन हा पूर्ण उपक्रम सुरू असल्याचे गंजाम जिल्ह्याचे जिल्हाथिकारी विजय कुलांगे यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
या प्रकल्पात सहा महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो. स्मार्ट वर्ग, ई-लायब्ररी, आधुनिक प्रयोगशाळा, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि खेळाचे मैदान. हा प्रकल्प मार्च 2021 मध्ये सुरू करण्यात आला आहे.
- आमदार-खासदारांनी दिल्या भेटी -