प्रयागराज : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची कोल्विन हॉस्पिटलबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांना आरोग्य तपासणीने हॉस्पिटमध्ये नेण्यात आले होते. माध्यमांशी बोलत असतानाच दोघांनाही हल्लेखोरांनी ठार केले. पोलिसांनी तिघांनाही घटनास्थळीच अटक केली आहे. लवलेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी अशी हल्लेखोरांची नावे आहेत.
पोलिसांनी माफिया अतिक आणि अशरफ यांना प्रयागराजमधील कोल्विन रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची कोठडी सुनावलेली आहे. पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक रायफल घेऊन दोघांच्याही पुढे चालत होते. त्यांच्यासोबत अनेक प्रसारमाध्यमे प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माईक घेऊन चालत होते. अतिक अहमदच्या मुलाचा पोलिसांनी एन्काउन्टर केल्याने माध्यमांना त्याची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. काळा टी-शर्ट घातलेला अशरफचा भाऊ अतीकच्या उजवीकडे होता. तर अतिकने पांढरा कुर्ता घालून डोक्यावर पांढरा गमजा बांधला होता.
माध्यमांशी बोलत असतानाच हल्लेखोरांना झाडल्या गोळ्या-दोघे पोलीस व्हॅनमधून खाली उतरताच माध्यम प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मुलगा असदच्या अंत्यसंस्काराला न जाण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अतिक म्हणाले, 'आम्हाला नेण्यात आले नाही.' यानंतर अश्रफला गुड्डू मुस्लिमवर काही बोलायचे होते, मात्र तोंडातून 'मैं बात ये है की गुड्डू मुस्लिम' असे म्हणताच पडताच अचानक बंदुकीतून आलेली गोळी आतिकच्या डोक्यात लागली. रक्तबंबाळ अतिक खाली पडला. काही कळायच्या आत अश्रफवरही अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या.
एक पोलीस कर्मचारी व पत्रकारदेखील जखमी झाले-एकीकडे माध्यमांचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना काही कळायच्या आत दोन्ही माफियांचा गोळ्या लागून खाली कोसळले होते. हल्लेखोरांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. घटनेत एक पोलीस कर्मचारी व पत्रकारदेखील जखमी झाले आहेत. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना तातडीने स्वरूपराणी नेहरू रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.