नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोस्ट वॉन्टेड गँगस्टर आणि गोगी टोळीचा म्होरक्या दीपक बॉक्सरला मेक्सिकोतून अटक केली आहे. यासाठी दिल्ली पोलिसांनी तेथील तपास संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) यांचे सहकार्य घेतले आहे. गँगस्टर दीपक बॉक्सरला एक-दोन दिवसांत भारतात आणले जाईल. तो दिल्ली एनसीआरमधील सर्वात मोठा आणि मोस्ट वॉन्टेड गँगस्टर आहे. बनावट पासपोर्टच्या मदतीने तो परदेशात पळून गेला होता. गेल्या वर्षी डिसेंबर किंवा या वर्षी जानेवारीत तो मेक्सिकोला पळून गेला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांना अलीकडेच एका पासपोर्टबद्दल माहिती मिळाली होती, ज्यावर दीपक बॉक्सरचा फोटो होता, परंतु तो पासपोर्ट मुरादाबादचा रहिवासी रवी अंतील या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होता. हा बनावट पासपोर्ट यावर्षी 29 जानेवारी रोजी बनवण्यात आला होता. या पासपोर्टचा वापर करून दीपकने रवी या टोपणनावाने कोलकाता ते मेक्सिकोला विमान प्रवास केला होता. बिल्डरच्या हत्येप्रकरणी दीपक बॉक्सर हवा होता : अमित गुप्ता नावाच्या बिल्डरच्या हत्येप्रकरणी दीपक बॉक्सर दिल्ली पोलिसांना हवा होता. अमित गुप्ताची ऑगस्ट २०२२ मध्ये बुरारी भागात हत्या झाली होती. हल्लेखोरांनी त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्याानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान अमित गुप्ता यांचा मृत्यू झाला.