म्हैसूर -एका खासगी महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे 150 किलोमीटर असलेल्या म्हैसूरमध्ये हा प्रकार घडला. विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासोबत शहरातील चामुंडी टेकडीवर गेली असताना आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही एक नाजूक बाब आहे. सर्व माहिती उघड करू शकत नाही. या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. लैंगिक छळाच्या आरोपावरून अलानहल्ली पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त डॉ. चंद्रगुप्त यांनी दिली.
कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनी घटनेवर दु:ख व्यक्त केले. ही एक दुर्दैवी घटना आहे. एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एडीजीपी प्रताप रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हैसूरला पाठवले आहे. उद्या मीही म्हैसूरलाही जाईन. आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू, असे ते म्हणाले. तसेच पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.