हैदराबाद : विनायक दामोदर सावरकर हे नाव जगभरात त्यांच्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात दिलेल्या योगदानामुळे सुपरिचित आहे. मात्र गणेश उर्फ बाबाराव सावरकर या नावाला फारसे वलय नसल्याचे दिसून येते. गणेश सावरकर हे विनायक सावरकर यांचे बंधू होते. त्यांनी इंग्रजविरोधातील केलेल्या कारवायांमुळे त्यांनाही काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. गणेश सावरकर यांचे आणखी एक महत्वाचे काम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच संस्थापकापैंकी ते एक होते.
भगूरमध्ये झाला जन्म :गणेश सावरकर यांचा जन्म भगूरमध्ये १३ जून १८७९ ला झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षणही भगूरमध्येच पार पडले होते. मात्र त्यांच्या आईच्या निधनानंतर प्लेगच्या बिमारीने त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यामुळे गणेश सावरकर खचून गेले. संन्यास घेण्याचा त्यांचा निर्णय त्यामुळे रद्द करावा लागला. त्यांच्यावर त्यांच्या दोन्ही लहान भावांची जबाबदारी आली. त्यानंतर त्यांनी आपल्या दोन्ही भावांचे पालन पोषण करत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले.
अभिनव भारत सोसायटीची केली स्थापना :विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे भाऊ असलेल्या गणेश सावरकर यांनी १९०४ मध्ये विनायक सावरकर यांच्यासोबत मिळून अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून ते भारतीय स्वतंत्र्य लढ्याच्या चळवळीचे नियोजन करत होते. मात्र विनायक दामोदर सावरकर हे आपल्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतर गणेश सावरकर यांनी या संस्थेच्या माध्यमातून निधी गोळा करुन स्वातंत्र्य सैनिकांचे साहित्य अभिनव भारतच्या माध्यमातून प्रकाशित करुन ते प्रसिद्ध करत होते. त्यामुळेच १९०९ मध्ये गणेश सावरकर यांच्यावर ब्रिटीश सैन्याने पाळत टेवली होती.