नवी दिल्ली Gandhi jayanti 2023 :आज 2 ऑक्टोबर रोजी, देशभरात महात्मा गांधी आणि लाल बाहदूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेत्यांनी राजघाटावर जात महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला होता. तर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला होता.
राष्ट्रपती, उपाध्यक्षांनीही वाहिली आदरांजली : महात्मा गांधींच्या जयंतीदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनीही राजघाटावर जाऊन आदरांजली वाहिली. यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही राजघाटावर जात श्रद्धांजली अर्पण केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी, डॉ. जितेंद्र सिंग यांनीही राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली : काही वेळापूर्वी पंतप्रधान मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. तत्पूर्वी, त्यांनी सोशल मीडिया X वर ट्विट करताना त्यांनी लिहिलं की, गांधी जयंतीनिमित्त मी महात्मा गांधींना अभिवादन करतो. महात्मा गांधींचा प्रभाव जागतिक आहे, जो संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेच्या भावनेचा पाठपुरावा करण्यास प्रेरित करतो. त्यांनी पुढे लिहिले की, गांधीजींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
- उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही वाहिली आदरांजली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही जयंतीनिमित्त बापूंचे स्मरण केले. त्यांनी X वर पोस्ट लिहून त्यांनी आदरांजली वाहिली. पोस्ट करताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिलं की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त राज्यातील जनतेला खूप शुभेच्छा असं त्यांनी पोस्ट केलंय.
शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त स्मरण : शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त पोस्ट करताना मोदींनी लिहिलं की, लाल बहादूर शास्त्रीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करत आहे. त्यांचा साधेपणा, देशाप्रती समर्पण आणि 'जय जवान, जय किसान'ची प्रतिकात्मक हाक आजही पिढ्यांना प्रेरणा देते. भारताच्या प्रगतीप्रती त्यांची अतूट बांधिलकी आणि आव्हानात्मक काळात त्यांचे नेतृत्व अनुकरणीय आहे. सशक्त भारताचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहू या आशयाची त्यांनी पोस्ट केली आहे.
हेही वाचा :
- Gandhi Jayanti 2023 : 'या' ठिकाणी आजही आहे गांधीजींचा चरखा, अनेकांना मिळतो रोजगार
- Gandhi Jayanti 2023 : महात्मा गांधींच्या सूचनेनुसार वाराणशीत बांधण्यात आलं होत मंदिर, 'या' मंदिराची खासियत पाहून मिळतो सर्वधर्मभावाचा संदेश
- International Day of Non-Violence : आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन का साजरा केला जातो , महात्मा गांधींशी काय आहे संबंध, जाणून घ्या...