जयपूर - प्रख्यात गांधीवादी विचारवंत डॉ.एस.एन.सुब्बाराव यांचे बुधवारी सकाळी जयपूर येथे निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर एसएमएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्रकृती खालावली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुब्बाराव यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली होती.
सुब्बाराव यांना मध्य प्रदेशातील मोरेनाची विशेष ओढ होती. सुब्बाराव यांनी 1976 पर्यंत 654 डाकूंनी शरणागती स्वीकारयला लावली होती आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले होते. खोऱ्यातील डाकूंना सन्मार्गावर आणण्यासाठी त्यांनी काम केले होते. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर वाईट प्रवृत्तीवर मात करत सन्मार्गाची वाट धरता येते, असे त्यांचे मत होते. पुराणात आपण वाल्याचा वाल्मीकी झाल्याचे वाचतो. पण कलियुगातील खरे वाल्मीकी मी चंबळ खोऱ्यातील डाकूंच्या रूपात बघितले, असे त्यांनी शरणागती पत्कारलेल्या डाकूंबद्दल म्हटलं होतं.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतली होती डॉ.एस.एन.सुब्बाराव यांची भेट तरुणांसाठी प्रेरणास्रोत मानले जाणारे डॉ.एस.एन.सुब्बाराव हे मूळचे कर्नाटकचे. सुब्बाराव यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळपर्यंत जौरा गांधी आश्रमात पोहचेल. डाकुंनी ज्या ठिकाणी आत्मसमर्पण केले होते. त्या ठिकाणावरच सुब्बाराव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत सामील -
गांधीवादी विचारवंत डॉ. एस.एन. सुब्बाराव यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1929 रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे झाला. शाळेत शिकत असताना सुब्बारावांना महात्मा गांधींच्या शिकवणीची प्रेरणा मिळाली. 9 ऑगस्ट 1942 रोजी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. ब्रिटीश पोलिसांनी अटक केल्यावर त्यांनी भिंतीवर 'भारत छोडो' असे लिहिले होते. तेव्हापासून सुब्बाराव स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय झाले. विद्यार्थीदशेत त्यांनी विद्यार्थी काँग्रेस आणि राष्ट्र सेवा दलाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
पद्मश्रीसह अनेक पदव्यांनी सन्मानित
भारत छोडो आंदोलनात सहभागी असलेले सुब्बाराव यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना 1995 मध्ये राष्ट्रीय युवा प्रकल्पासाठी राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला होता. भारतीय एकता पुरस्कार आणि वर्ल्ड पीस मूव्हमेंट ट्रस्ट इंडिया द्वारे प्रदान केलेला शांतीदूत आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला होता. 2002 मध्ये जागतिक मानवाधिकार प्रोत्साहन पुरस्कार, राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार 2003, राष्ट्रीय संप्रदाय सद्भावना पुरस्कार 2003, जमालाल बजाज पुरस्कार 2006, महात्मा गांधी पुरस्कार, अनुवर्त अहिंसा पुरस्कार-2010 पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता.
हेही वाचा -समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' समोर: 'स्वीट कपल' म्हणत नवाब मलिक यांचं नवीन ट्वीट