नवी दिल्ली G२० Summit :नवी दिल्ली येथे आयोजित जी २० शिखर परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. या दोन दिवसीय परिषदेत, देशा-देशांमधील विश्वासार्हतेची कमी, हवामान बदल तसेच जागतिक आर्थिक समस्या सोडवण्याच्या दिशेनं चर्चा जारी आहे. यासाठी जगभरातील नेते एकत्र आले आहेत.
बैठकीच्या दुसऱ्या दिवसाचा अजेंडा :परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य भारत मंडपम येथे आयोजित 'एक भविष्य' या शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राचं अध्यक्षपद स्वीकारलं. भारत महत्त्वाच्या जागतिक बाबींवर चर्चा घडवून आणत असताना जग याकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान मोदी आज फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. तसेच ते कॅनडाच्या नेत्यांसोबत देखील बैठका घेतील. या संवादांमुळे राजनैतिक संबंध दृढ होण्यासह परस्पर सहकार्य वाढेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय, पंतप्रधान मोदी कोमोरोस, तुर्की, यूएई, दक्षिण कोरिया, युरोपियन युनियन, ब्राझील आणि नायजेरियाच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील.
पहिल्या दिवशी अनेक ऐतिहासिक घोषणा झाल्या : जी २० शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी अनेक ऐतिहासिक घोषणा झाल्या. यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे ग्लोबल बायोफ्युएल अलायन्सचा शुभारंभ. हा एक सहकारी उपक्रम आहे ज्याचा उद्देश हवामानातील बदल कमी करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैवइंधनाच्या संभाव्यतेचा उपयोग करणे आहे. जी २० नं २०३० पर्यंत जागतिक अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याच्या दिशेनं काम करण्याचं वचन दिलं आहे. हे एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट असून, ते स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्त्रोतांच्या उपयोग करण्यावर भर देतं.