नवी दिल्ली :जी-20 शिखर परिषदेनिमित्त जगभरातून विविध देशांचे पंतप्रधान, पराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी हजेरी लावणार आहेत. नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील भव्य अशा भारत मंडपम बिल्डिंगमध्ये जी २० बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.
पाहुण्यांच्या स्वागतासाठी विविध प्रकारच्या पाककृती आणि विविध चविष्ठ अशा अन्नपदार्थांची व्यवस्था करण्यात येत आहे. जी २० परिषदेत 400 प्रकारचे पदार्थ असणार आहेत. तर 700 हून अधिक शेफ असणार आहेत. अधिक काळजी घेण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. हे सर्व अधिकारी २३ पंचतारांकित हॉटेल आणि भारत मंडपम इमारतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर लक्ष ठेवून आहेत. अन्न तयार करण्यासाठी लागणारे घटक बारकाईने तपासले जात आहेत. स्वच्छतेबाबत कर्मचाऱ्यांना काळजी घेण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
शाकाहारी व मासांहारी दोन्ही पदार्थ असणार उपलब्ध-भारत मंडपम इमारतीतच स्वयंपाकघराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यांना चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. काही पदार्थ आवर्जून तृणधान्यापासून करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने तृणधान्याच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहेत. विदेशातील पाहुण्यांची आवड लक्षात घेऊन शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ उपलब्ध असणार आहेत. जगभरात प्रसिद्ध असलेले सॅल्मन फिश आणि ऑक्टोपस जपानहून आणण्यात आले आहेत.