नवी दिल्ली G20 Summit : नवी दिल्लीत शनिवारी १८ व्या जी २० शिखर परिषदेचं आयोजन होत आहे. या परिषदेसाठी ३० हून अधिक राष्ट्रप्रमुख, १४ आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख आणि युरोपियन युनियनचे उच्च अधिकारी उपस्थित आहेत. या परिषदेचा अजेंडा काय असणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'वसुधैव कुटुंबकम्' परिषदेची थीम : जी २० नेत्यांच्या शिखर परिषदेदरम्यान 'वन अर्थ' हा चर्चेचा मुख्य विषय असेल. त्यावर आधारित 'वन अर्थ' हे पहिलं सत्र होईल. या वर्षीच्या जी २० शिखर परिषदेची थीम 'वसुधैव कुटुंबकम्' किंवा 'एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य' अशी आहे. ही उपनिषदाच्या प्राचीन संस्कृत ग्रंथातून घेतली आहे. ही थीम मानव, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांच्यातील परस्परसंबंधांची पुष्टी करते. 'वन अर्थ' सत्राच्या समारोपानंतर दुपारी ३.०० वाजता 'एक कुटुंब'चं दुसरं सत्र आयोजित केलं जाईल.
संध्याकाळी ७ वाजता डिनरचं आयोजन : संध्याकाळी सुमारे ७ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या डिनरचा कार्यक्रम होईल. या डिनरला विविध देशांचे प्रमुख, मोदी सरकारच्या सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री तसेच देशातील काही माजी ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे या डिनरला उपस्थित राहणार आहेत. मात्र चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे या शिखर परिषदेत सहभागी झालेले नाहीत.