नवी दिल्लीDeluge dampens G20 summit: G20 शिखर परिषदेदरम्यान मुसळधार पावसानं दिल्लीत हजेरी लावली. त्यामुळं भारत मंडपम कार्यक्रमस्थळी पाणी साचलं होतं. यावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाना साधला आहे. सध्या भारत मंडपाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे. यावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाणा साधत विकास पोहत असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केलाय. भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांनी म्हटले, 'जी-20 सदस्यांच्या मेजवानीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या 'भारत मंडपमपात विकास पोहत आहे.
- विकासाची पोलखोल :हाच व्हिडिओ 'X' वर काँग्रेसच्या अधिकृत मीडिया प्लॅटफॉर्म INC-TV नं देखील शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहलंय की, हा मोदी सरकराचा पोकळ विकास उघड झालाय. G20 साठी भारत मंडपम तयार करण्यात आला आहे. हा मंडप तयार करण्यासाठी भारत सरकारनं 2 हजार 700 कोटी रुपये खर्च केलाय.
- महात्मा गांधींना आदरांजली :राष्ट्रीय राजधानीत G20 शिखर परिषद सुरू झाली आहे. G20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सर्व नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. विविध देशांतील मान्यवर नेत्यांनी महात्मा गांधी यांच्या स्मृती स्थळाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली होती.
विविध देशांचे दिग्गज नेते राजघाटावर :दिग्गज नेत्यांनी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध नेत्यांनी सकाळी राजघाटाकडे कूच केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानिस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते.