नवी दिल्ली G20 Summit : जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दिल्लीत दाखल झालेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अक्षता सुद्धा दाखल झाल्या आहेत. विमानतळावर केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सुनक आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत केलं. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान झाल्यानंतर ऋषी सुनक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. (Britain PM Rushi Sunak)
पंतप्रधान मोदींसोबत होणार द्विपक्षीय बैठक :मी पूर्ण लक्ष्य केंद्रित करून G20 परिषदेकडे जात असून यात जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करणे, आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करणे आणि सर्वात असुरक्षित लोकांना आधार देणे समाविष्ट असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सांगितलं होतं. पुतिन पुन्हा G20 ला पाठिंबा दर्शविण्यात अयशस्वी झाले आहेत. परंतु आम्ही युक्रेनला पाठिंबा दर्शवू, असं सुनक यांनी X वर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलयं. या परिषदेत पुतीन यांच्या युद्धाच्या भयंकर परिणामांना सामोरे जाणं, हवामान बदल आणि जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिरता यावर या G20 परिषदेत भर देणार असल्याचं इंग्लंडच्या पंतप्रधान कार्यालयानं सांगितलय. G20 परिषदेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर रोजी ऋषी सुनक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. या वर्षी मे महिन्यात हिरोशिमा येथे G7 परिषदेच्या वेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. तेव्हा दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांसह भारत-यूके मुक्त व्यापार करार, नवकल्पना आणि विज्ञान यावर चर्चा करण्यात आली होती. सध्या दोन्ही देश मुक्त व्यापार करारावर बोलणी करत असून 2022 मध्ये याची चर्चा सुरू झाली होती. इंग्लंड-भारत मुक्त व्यापार करारावर चर्चेची 12 वी फेरी 8 ते 31 ऑगस्ट दरम्यान पार पडलीय. इंग्लंड-भारत मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटीची प्राथमिक चर्चा झाल्यानंतर इंग्लंडच्या अनेक अधिकाऱ्यांनी दिल्लीला प्रत्यक्ष हजेरी लावली होती. या वर्षी ऑगस्टमध्ये, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि यूकेचे व्यापार राज्य सचिव केमी बडेनोच यांनी इंग्लंड-भारत मुक्त व्यापार कराराचा आढावा घेत हा करार पुढे नेण्यावर सहमती दर्शवली. या चर्चेची 13वी फेरी सप्टेंबर महिन्यात होणार आहे.