नवी दिल्ली G२० Summit :देशाच्या राजधानीत जी20 परिषदेला सुरुवात झाली आहे. जी20 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सगळ्या दिग्गज नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. विविध देशांच्या दिग्गज नेत्यांनी महात्मा गांधीच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होत आदरांजली अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरुवात झाली.
राजघाटावर जमले विविध देशाचे दिग्गज नेते :दिल्लीतील राजघाटावर दिग्गज नेत्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विविध राष्ट्रप्रमुखांनी सकाळीच राजघाटकडं कूच केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानिस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रॅूडो, बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आदी दिग्गज नेत्यांचा समावेश होता.
पंतप्रधान मोदींनी बापू आश्रमाची प्रतिमा दिली भेट :राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली देण्यासाठी आलेल्या विविध देशाच्या प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील बापू आश्रमाची प्रतिमा भेट दिली आहे. महात्मा गांधी हे बापू कुटीत आश्रमात 1938 ते 1948 पर्यंत राहिले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापू कुटीची प्रतिमा भेट दिल्यानं महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे.