डेहराडून : अफगाणिस्तानात तालिबानने नियंत्रण मिळविल्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. अफगाणिस्तानातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील डेहराडून इथे भारतीय सैन्य अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या 83 अफगाण कॅडेटसचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. तालिबानपुढे गुडघे टेकत अफगाण राष्ट्रपतींनी देश सोडून पलायन केले आहे. या परिस्थितीत आता पुढे काय असा मोठा गहन प्रश्न या कॅडेटसमोर उभा राहिला आहे.
डेहराडून येथील भारतीय सैन्य अकादमीत 18 मित्र देशांतील अनेक कॅडेटस् दरवर्षी प्रशिक्षण घेत असतात. येथून पासआऊट झाल्यानंतर हे कॅडेटस् त्यांच्या देशात सैन्य अधिकारी पदावर रुजू होत असतात. यात अफगाणिस्तानातील कॅडेटसचाही समावेश असतो. प्रत्येक देशासाठीच्या कॅडेटसचा कोटा निश्चित असतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानचा कोटा वाढविण्यात आला आहे.
भवितव्य अधांतरी
सध्या डेहराडून इथे सैन्य अकादमीत अफगाणिस्तानचे 83 कॅडेटस प्रशिक्षण घेत आहेत. यापैकी 40 कॅडेट येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पासिंग आऊट परेडनंतर अधिकारी बनून आपल्या देशात गेले असते. मात्र त्यापूर्वीच तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे आता पुढे काय होणार, कुठे जायचे असे अनेक प्रश्न या कॅडेटसमोर उभे राहिले आहेत. या कॅडेटसना सध्या अफगाणिस्तानातील आपल्या कुटुंबियांविषयी चिंता वाटत आहे. सर्व कॅडेटस फोनवरून आपल्या कुटुंबियांसोबत संपर्कात असून सर्वांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचे अकादमीतील जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल हिमानी पंत यांनी सांगितले.
आता कुठे जाणार?
ज्या देशाच्या सैन्यदलासाठी हे कॅडेट प्रशिक्षण घेत होते, त्या देशाचे अस्तित्वच आता धोक्यात आले आहे. ज्या सैन्यदलात ते समाविष्ट होणार होते, त्या सैन्यदलानेच शरणागती पत्करली आहे. त्यामुळे प्रशिक्षणानंतर कुणासाठी काम करणार आणि प्रशिक्षण घेऊन कुठे जाणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
प्रशिक्षण नियमितपणे सुरू
सध्या हे कॅडेटस नियमितपणे प्रशिक्षण घेत असून अफगाणिस्तानातील परिस्थितीचा त्यांच्या प्रशिक्षणावर कसलाही परिणाम झाला नसल्याचे आयएमएचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल हिमानी पंत यांनी सांगितले. डिसेंबरमध्ये अफगाणचे 43 कॅडेट पास आऊट होतील. तर जून 2022 मध्ये 40 अफगाण कॅडेटस पास आऊट होतील. मात्र अजूनही अफगाण सरकारकडून यांच्याविषयी कसलाही संदेश मिळाला नसल्याचे पंत यांनी सांगितले. संरक्षण मंत्रालयाच्या दिशानिर्देशांनुसार अकादमी प्रशासनाकडून काम केले जाईल असे ते म्हणाले. सध्या अकादमीत अफगाणिस्तानशिवाय भूतान, नेपाळ, श्रीलंका, तझाकिस्तान, मालदीव आणि व्हिएतनामसह 18 मित्र राष्ट्रांचे कॅडेटस प्रशिक्षण घेत आहेत. 2018 मध्ये अकादमीतून अफगाणिस्तानचे 49 कॅडेटस पास आऊट झाले होते. डिसेंबर 2020 मध्ये 41, जून 2021 मध्ये 43 अफगाण कॅडेटस पासआऊट झाले होते.
अफगाण संकट : डेहराडूनमधील 83 अफगाण कॅडेटसचे भवितव्य अधांतरी भवितव्य तालिबानच्या हाती
या कॅडेटसना अफगाणिस्तानातील परिस्थिती सामान्य होईपर्यंत थांबविले जाऊ शकते असे शौर्य चक्र विजेते निवृत्त कर्नल राकेश सिंह कुकरेती यांनी सांगितले. जोपर्यंत हे कॅडेट इथे प्रशिक्षण घेत आहेत, तोपर्यंत त्यांच्या जीवन सुरक्षेची जबाबदारी भारत सरकारची आहे असे ते म्हणाले. सध्या तालिबानला चीन, रशिया, तुर्की आणि पाकिस्तानने मान्यता दिली आहे. जर इतर देशांकडूनही तालिबानला मान्यता मिळाली तर तालिबान सरकारच्या मागणीवरून या कॅडेटसना अफगाणिस्तानात परत पाठविले जाऊ शकते असे ते म्हणाले. जर या कॅडेटसना भारतात सेवा देण्याची इच्छा असेल तर त्याविषयी मात्र भारत सरकारला निर्णय घ्यावा लागेल असे ते म्हणाले.
हेही वाचा -Viral Video : अफगाणिस्तानातून निघण्यासाठी नागरिकांची काबूल विमानतळावर पुन्हा गर्दी