महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Oommen Chandy Funeral : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार, राहुल गांधी कोट्टयमला दाखल - पुथुपल्ली हाऊस

केरळचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चांडी यांच्यावर आज कोट्टयममधील पुथुपुल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी ओमन चांडी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तिरुनाक्कारा मैदानात ठेवण्यात येणार आहे.

Oommen Chandy Funeral
ओमन चांडी यांची अंत्ययात्रा

By

Published : Jul 20, 2023, 11:14 AM IST

तिरुवनंतपुरम :केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चांडी यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी कोट्टायमच्या पुथुपल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे पार्थिव घेऊन जाणारी अंत्ययात्रा 24 तासाच्या प्रवासानंतर आज सकाळी कोट्टायमला पोहोचली. 19 जुलैला सकाळी 7.15 वाजता ओमन चांडी यांच्या तिरुवनंतपुरम येथील निवासस्थान असलेल्या पुथुपल्ली हाऊस येथून त्यांचे पार्थिव घेऊन अंत्ययात्रा निघाली होती.

लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी वाहिली श्रद्धांजली :माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्या पार्थिवाचे त्यांच्या समर्थकांनी साश्रू नयनांनी अंतिम दर्शन घेतले. बुधवारी संध्याकाळी 6 वाजतापासून कोट्टायम येथील तिरुनाक्कारा मैदानात ओमन चांडी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्याचे ठरले होते. मात्र आज सकाळी साडेसात वाजता अंत्ययात्रा कोट्टायम येथे पोहोचली. नागरिकांनी रस्त्यात थांबून आपल्या लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी आदरांजली वाहिली. ओमन चांडी यांचे पार्थिव घेऊन जाणारी खास तयार केलेली KSRTC बस श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध ठिकाणी थांबवण्यात आली. भर पावसातही ओमन चांडी यांच्या समर्थकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली.

रस्त्याच्या कडेला नागरिकांची गर्दी :काँग्रेसचे दिग्गज नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे बंगळुरुत निधन झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. ओमन चांडी यांचा सर्वस्तरातील नागरिकांशी दांडगा जनसंपर्क होता. नागरिकांचेही त्यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे ओमन चांडी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला मोठ्या रांगा केल्या आहेत.

पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार तिरुनाक्कारा मैदानात :आज ओमन चांडी यांचे पार्थिव कोट्टायम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तिरुनाक्कारा मैदानातही त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी पुथुप्पल्ली येथील त्यांच्या निवास्थानी त्यांचे पार्थिव नेण्यात येईल. त्यानंतर पुथुपल्ली येथील सेंट जॉर्ज ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये दुपारी 3.30 वाजेपर्यंत ओमन चांडी यांच्यावर अंत्यसंस्काराचे नियोजन करण्यात आले आहे. कोट्टायमला पोहोचण्यासाठी अपेक्षित वेळ ओलांडली असल्याने अंत्यविधीला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अंत्यसंस्कारासाठी राहुल गांधी केरळमध्ये दाखल :ओमन चांडी यांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमध्ये पोहोचले आहेत. ओमन चांडी यांच्यावर होणाऱ्या अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मलंकारा ऑर्थोडॉक्स चर्च आणि पुथुप्पल्ली यांच्या सेवेबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी एक विशेष थडगे तयार करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोट्टायममधील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. घशाच्या कर्करोगावर उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात ओमन चांडी यांचे निधन झाले.

हेही वाचा -

  1. Oommen Chandy last journey : दिवंगत काँग्रेस नेते ओमन चांडी यांच्या पार्थिवावर पुथुपल्लीमध्ये होणार अंतिम संस्कार , हजारो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी
  2. Oommen Chandy passes away : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ABOUT THE AUTHOR

...view details