जयपूर :आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत जयपूरमधील बिडला सभागार येथे 'स्मार्टफोन योजने'चा शुभारंभ करतील. या योजनेंतर्गत 40 लाख महिलांना आणि विद्यार्थ्यांना स्मार्टफोन दिले जाणार आहेत. याचबरोबर 'डिजिटल सखी बुक' योजनादेखील आज लॉन्च केली जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या फेरीत 'चिरंजीवी योजना' लाभार्थी असलेल्या कुटुंबामधील महिलांना स्मार्टफोन दिले जातील. दरम्यान याआधी राहुल गांधींनी या योजनेची सुरुवात मानगढ येथे विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देऊन केली होती.
कोणाला मिळेल स्मार्टफोन : राजस्थान सरकारकडून मोबाईल आणि सिमसाठी पैसे दिले जाणार आहेत. स्मार्टफोन आणि सिमसाठी 6 हजार 800 रुपये थेट लाभार्थ्यांच्या ई-वॉलेटमध्ये जमा केले जाणार आहेत. यासह सरकारी शाळेत 9 वी ते 12 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही स्मार्टफोन मिळणार आहेत. उच्च शिक्षणसंस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी, विधवा/ एकल नारी पेन्शन योजनेतील लाभार्थी महिला, 2022-23 या वर्षात मनरेगा योजनेंतर्गत 100 दिवस काम केलेल्या कुटुंबातील महिला तसेच 2022-23 या वर्षात इंदिरा गांधी शहरी रोजगार गारंटी योजनेत 50 दिवस काम केलेल्या महिलांना स्मार्टफोन मिळणार आहेत.
मोफत मिळेल मोबाईल आणि सिम : स्मार्टफोन योजनेसाठी निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शिबिरात तारखेनुसार बोलवले जाईल. शिबिरात बोलावण्यासाठी प्रशासन त्यांना एसएमएसद्वारे आमंत्रण देईल. तसेच एक पावती देण्यात येईल. यात शिबिराची तारीख, शिबिराचे ठिकाण आणि कोणती कागदपत्रे सोबत आणायची आहेत, याची माहिती असेल. तसेच लाभार्थ्यांना शिबिरात आपल्यासोबत एक स्मार्टफोन न्यावा लागेल. त्या मोबाईलमध्ये ई-वॉलेट डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर नवीन मोबाईल फोन लाभार्थ्यांना मिळेल.