महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Foxconn Vedanta Deal : पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला झटका, फॉक्सकॉन-वेदांता ग्रुपमधील करार रद्द - फॉक्सकॉन वेदांता ग्रुपमधील करार रद्द

फॉक्सकॉन आणि वेदांता ग्रुप यांच्यातील करार रद्द झाला आहे. भारतात सेमीकंडक्टरच्या उत्पादनाबाबत हा करार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात होते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. जर त्याचे उत्पादन भारतातच सुरू झाले तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत बरीच कमी होऊ शकते.

FOXCONN VEDANTA DEAL CANCELLED
फॉक्सकॉन वेदांता ग्रुपमधील करार रद्द

By

Published : Jul 11, 2023, 9:33 PM IST

नवी दिल्ली : भारतातील सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी सरकारने पुन्हा अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जगातील आघाडीच्या कंपन्या यात सहभागी होतील, अशी सरकारला आशा आहे. मात्र, सोमवारी आलेली एक बातमी भारतासाठी धक्का मानली जात आहे. तैवानची प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉनने सेमीकंडक्टर उत्पादनाबाबत वेदांत समूहासोबत केलेला करार रद्द केला आहे. दोन्ही कंपन्यांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, वेदांता समूहाचे मालक अनिल अग्रवाल यांनी सेमीकंडक्टर उत्पादनासाठी आपण पूर्णपणे वचनबद्ध असून ते पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने इतर भागीदारांशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले.

प्लांट उभारण्याची योजना होती : फॉक्सकॉन ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. ते ऍपलसारख्या कंपन्यांसाठी आयफोन तयार करतात. गेल्यावर्षी फॉक्सकॉन आणि वेदांता यांनी भारतात सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे युनिट पीएलआय अंतर्गत स्थापन केले जाणार होते. यासाठी केंद्र सरकारने 10 अब्ज डॉलरची मदत जाहीर केली होती. या कराराकडून देशाला मोठ्या आशा होत्या, पण अखेर हा करार मोडीत निघाला.

केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्टीकरण : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखरन म्हणाले की, या निर्णयामुळे आमच्या उद्दिष्टांवर कोणताही परिणाम होणार नाही. सेमीकंडक्टरबाबत अवलंबलेली रणनीती यापुढेही सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. चंद्रशेखरन म्हणाले की, भारताने गेल्या 18 महिन्यांत सेमीकॉनच्या उत्पादनात लक्षणीय प्रगती केली असून ही मोहीम सुरूच राहणार आहे.

जगातील सर्वात मोठा करार :फॉक्सकॉन आणि वेदांता यांनी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला होता. हा करार 19.5 अब्ज डॉलर्सचा होता. सेमीकंडक्टर उत्पादनाच्या क्षेत्रातील हा जगातील सर्वात मोठा करार असल्याचे मानले जात होते. फॉक्सकॉनने सोमवारी सांगितले की, ते वेदांता समूहासोबतचा करार संपुष्टात आणत आहे. दोन्ही कंपन्यांनी परस्पर सहमतीने हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे.

करार का मोडला? : हा करार का मोडला गेला याबाबत दोन प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. वेदांता ग्रुपने ज्या तंत्रज्ञांची मदत घेतली होती त्याबाबत फॉक्सकॉन खूश नव्हते, असे काही लोकांचे मत आहे. तर काहींच्या मते सरकारने PLI अंतर्गत पैसे देण्यास विलंब केला, त्यामुळे करार मोडला. मात्र अधिकृतपणे कोणीही कारण सांगितले नाही. फॉक्सकॉनचे एक निवेदन मंगळवारी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये कंपनीने भारताप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

काँग्रेसचा आरोप - सरकार फक्त प्रचार करते : करार मोडल्यानंतर काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, या प्रकल्पाची घोषणा करताना एक लाख नोकऱ्या निर्माण होतील, असा दावा करण्यात आला होता. सरकारने त्याची पूर्ण प्रसिद्धीही केली होती. ते पुढे म्हणाले की, व्हायब्रंट गुजरात परिषदेत असे करार केले जातात, ज्याची प्रसिद्धी केली जाते. पण ते शेवटपर्यंत पोहोचत नाहीत. उत्तर प्रदेशात होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटमध्येही अशीच स्थिती होणार आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले - काँग्रेस फक्त टीका करते : काँग्रेसच्या या आरोपांना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, काँग्रेस फक्त टीकाच करू शकते, पण भारताची प्रगती थांबवू शकत नाही. चंद्रशेखरन म्हणाले की, काँग्रेसने आपल्या राजवटीत सेमीकॉनसाठी कोणतेही काम केले नाही. केंद्रीय मंत्री म्हणाले की, दोन कंपन्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आणि नंतर त्यांनी दुसरा निर्णय घेतला, तर त्यात सरकारची कोणतीही भूमिका नाही. हा त्यांचा परस्पर मामला आहे.

सरकारने दिली होती सवलत : वेदांता आणि फॉक्सकॉन यांच्यातील करारांसाठी सरकारने मोठी सवलत जाहीर केली होती. ते पीएलआय योजनेंतर्गत देण्यात येणार होते. ही रक्कम 10 अब्ज डॉलर्स होती. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तेव्हा सांगितले होते की चिप उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने 76,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने 2026 पर्यंत सेमीकंडक्टर उत्पादनासाठी 63 अब्ज डॉलरचे उद्दिष्ट ठेवले आहे.

तीन कंपन्यांनी केले अर्ज : सेमीकंडक्टरचे उत्पादन वाढवण्यासाठी तीन कंपन्यांनी प्लांट उभारण्यासाठी अर्ज केला होता. यामध्ये फॉक्सकॉन-वेदांता, आयसीएमसी आणि आयजीएसएस व्हेंचर्स यांचा समावेश होता. आयजीएसएस ही सिंगापूरची कंपनी आहे. आयसीएमसीचा अर्ज प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. कारण त्यांची तांत्रिक सहयोगी कंपनी इंटेलने विकत घेतली आहे. आयजीएसएस त्याच्या अर्जावर पुनर्विचार करू इच्छिते. सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी सरकारने पुन्हा अर्ज मागवले आहेत.

मायक्रॉनशी करार : भारताने मायक्रॉनसारख्या अनुभवी सेमीकंडक्टर उत्पादकांवर भर द्यावा, असे काही वृत्तपत्रांतून सुचवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात सेमीकंडक्टर निर्माता कंपनी मायक्रॉनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मायक्रोनने 825 दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणाही केली आहे. तथापि, त्यांची गुंतवणूक उत्पादनात नव्हे तर पॅकेजिंग आणि चाचणीमध्ये असेल.

चिप उत्पादनात कोणाचे साम्राज्य? : तैवान संपूर्ण जगात सर्वाधिक चिप उत्पादन करतो. जागतिक बाजारपेठेत त्याचा वाटा 24 टक्के आहे. त्या खालोखाल दक्षिण कोरियाचा वाटा 19 टक्के आणि अमेरिकेचा वाटा 13 टक्के आहे. जपानचा हिस्सा 10 टक्के आहे. चीन पाचव्या क्रमांकावर आहे. तो 6 टक्के उत्पादन करतो.

हेही वाचा :

  1. PM Modi US Visit : अमेरिकन उद्योगपतींना भारतात गुंतवणूक करण्याची मोदींची ऑफर

ABOUT THE AUTHOR

...view details