कुर्नूल (आंध्र प्रदेश) -कोरोनाच्या भीतीने एकाच परिवारातील चौघांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना आंध्र प्रदेशच्या कुरनूल वड्डेगेरी परिसरात घडली आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रताप (वय 42), पत्नी हेमलता (वय 36), मुलगा जयंत (वय 17) आणि मुलगी ऋषिता (वय 14) अशी मृतांची नावे आहेत. प्रताप हे टीव्ही मॅकेनिकचे काम करत होते. मुलगा जयंत उच्च माध्यमिकमध्ये शिक्षण घेत होता. तर मुलगी ऋषिता ही इयत्ता सातवीत शिक्षण घेत होती.
कसा झाला खुलासा?
नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी घरातील कोणताही सदस्य बाहेर दिसला नाही. तसेच घराचा दरवाजाही उघडला नाही. त्यामुळे शेजारच्यांना संशय आला. त्यांनी दार वाजवल्यानंतरही आतून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी तिथे त्यांना चौघांचे मृतदेह आढळले.