नवी दिल्ली :पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार पहायला मिळत आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ही समिती सध्या पश्चिम बंगालसाठी रवाना झाली आहे.
पश्चिम बंगाल हिंसाचार : केंद्राची चार सदस्यीय समिती आढावा घेण्यासाठी रवाना - बंगाल हिंसाचार केंद्र आढावा समिती
10:47 May 06
पश्चिम बंगाल हिंसाचार : केंद्राची चार सदस्यीय समिती आढावा घेण्यासाठी रवाना
बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, निकालानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असलेला पहायला मिळतो आहे. मंगळवारपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या हिंसाचारांच्या घटनांमध्ये साधारणपणे सहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपाने या सर्व हिंसाचारांच्या घटनांसाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार ठरवले आहे. तसेच, बंगाल सरकार छुप्या पद्धतीने या सर्वाला पाठिंबा देत असल्याचा आरोपही भाजपाने केला आहे. हिंसाचारा दरम्यान कित्येक भाजपा कार्यकर्त्यांची दुकाने लुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच, कित्येकांच्या घरातील महिलांनाही मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे.
आतापर्यंत आपल्या १४ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तसेच, सुमारे १ लाख लोक या हिंसाचारामुळे आपल्या घरातून पळून गेल्याचा दावा करण्यात येतो आहे. या सर्व प्रकाराला ममतांची मूक संमती असल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बुधवारी केला होता.
हेही वाचा :गुरुग्राम : आयसीयूमध्ये मृत कोरोना रुग्णांना सोडून डॉक्टर फरार; सहा दिवसांनंतरही कारवाई नाही