पाटणा :बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये घराला लागलेल्या अचानक आगीत चार मुलींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रामदयाळू परिसरात सोमवारी रात्री उशिरा दीड वाजण्याच्या सुमारास झोपडपट्टीतील घराला आग लागली. काही वेळातच ही आग पसरत जावून आणखी तीन घरे जळून खाक झाली.
काही कळायच्या आत घरात झोपलेल्या मुली आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गंभीररित्या भाजल्या असताना त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्वांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत नरेश राम यांच्या चार मुलींचा मृत्यू झाला आहे. 12 वर्षांची सोनी, 8 वर्षांची शिवानी, 5 वर्षांची अमृता आणि 3 वर्षांची रीता अशी मृतांची नावे आहेत. शेजारी राहणारे राजेश राम आणि मुकेश राम यांच्या घरांना आग लागली. त्यांच्यावरदेखील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
लहान मुलगा वाचला-मृत मुलींची आई म्हणाली, की आगीत माझ्या चारही मुलींचा मृत्यू झाला. आम्ही रात्री झोपलो होतो, तेव्हा घराला आग लागली. आम्ही उठलो तोपर्यंत आगीने भीषण रुप घेतले होते. आगीतून मुलींना बाहेर काढता येत नव्हते. शेजारी एक लहान मुलगा होता. फक्त तोच वाचला आहे. मृताचे नातेवाईक म्हणाले, की रात्री 10 वाजता आम्ही नेहमीप्रमाणे झोपायला गेलो होतो. त्यानंतर आगीच्या ज्वाला जाणवताच आम्ही उठलो. पण तोपर्यंत चारही मुली आगीत होरपळून मृत्युमुखी पडल्या होत्या. यात 6 जण जखमी झाले होते.
आग कशी लागली याचा तपास सुरू-घराच्या मध्यभागी अचानक आग लागल्याचे स्थानिक लोक सांगत आहेत. त्यामुळे कोणीही धावू शकले नाही. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक सतेंद्र मिश्रा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, रात्री उशिरा आग लागली होती. उपचारादरम्यान 4 मुलींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर आणखी चार-पाच जणही जळाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आग कशी लागली याचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
हेही वाचा-Virat Kohli Birthday Post For Wife : विराटने पत्नी अनुष्का शर्मासाठी एक मोहक पोस्ट केली शेअर, म्हणाला...