सिवान (बिहार) - बिहारमधील सिवान जिल्ह्यातील भगवानपूर पोलीस ठाणे भागात एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि पाच मुलांवर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये चार मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर, पत्नी आणि एक मूल गंभीररीत्या जखमी झाले. हत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.
हेही वाचा -मध्य प्रदेश : धर्मांतरणासाठी पत्नीवर दबाव आणणाऱ्या पतीला अटक
भगवानपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विपिन सिंह यांनी मंगळवारी घटनेची पुष्टी केली आहे. बाला अलीमर्दनपूर गावात अवधेश चौधरी नावाच्या व्यक्तीने सोमवारी मध्यरात्री पत्नी आणि पाच मुलांवर धारदार शस्त्राने वार करत त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला. यात चार मुले जागीच ठार झाली. मृतांमध्ये तीन मुलगे आणि एका मुलीचा समावेश आहे. जखमी झालेल्या पत्नी आणि एका मुलाला स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पाटण्याच्या रुग्णालयात पाठवले आहे.
पोलीस ठाणे प्रभारी म्हणाले की, आरोपी अवधेश चौधरी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चौकशी केली जात आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा -झारखंड : अटकेवर 5 लाखांचे बक्षीस असलेल्या माओवाद्याने केले आत्मसमर्पण