पुरी -अंत्यसंस्काराच्या पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत मुलींनी लाडक्या आईच्या पार्थिवाला साश्रू नयनांनी ( Daughters Perform Last Rites of Mother ) खांदा दिला. मंगळघाट येथील रहिवासी जाति नायक या 80 वर्षांच्या होत्या. त्यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, त्यातील एकही आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी हजर राहिला नाही. यावेळी कोणतीही उणीव न भासू देता चार कन्यांनी आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा दिला.
मंगळघाट ते स्वर्गद्वार असे 4 किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन या मुलींनी आपल्या आईचा अंतिम संस्कारविधी पूर्ण केला. पुरीतील मंगळाघाट परिसरात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग हजारो लोकांनी अनुभवला. या मुलींनी बुरसटलेल्या परंपरेला मागे टाकत नवा आदर्श उभा केला आहे.
माझी आई लहान बहिणीजवळ राहात होती. माझ्या भावाने आईची कधीच काळजी घेतली नाही. अंतिम संस्कारासाठी ते आले नाही. म्हणून आम्ही चौघींनी तिचे अंतिम संस्कार करायचे ठरवले. शेजाऱ्यांच्या मदतीने आम्ही मृतदेह नेला आणि स्वर्गद्वार येथे अंत्यसंस्कार केले, असे जाति नायक यांच्या दुसरी कन्या सुशीला साहू यांनी म्हटलं.