लखनऊ :बालगृहातील चार चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना लखनऊच्या प्राग नारायण रोडवरील राजकीय बालगृहात उघड झाली आहे. याप्रकरणी बालगृहाच्या अधिक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे. अंतरा, लक्ष्मी, आयुषी आणि दिपा असे मृत्यू झालेल्या चार चिमुकल्यांची नावे आहेत. थंडीमुळे या चिमुकल्यांचा निमोनियाने मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
न्यायालयीन चौकशी:डिसेंबर आणि जानेवारीमध्ये योग्य देखभाल न झाल्यामुळे चार चिमुकल्यांचे स्थिती खराब झाली. यामुळे थंडीने या चिमुकल्यांना निमोनिया झाला. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या चिमुकल्यांना थंडीपासून बचावासाठी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे डीपीओ विकास सिंह यांनी या चिमुकल्यांचे शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. त्यासह याप्रकरणी बालगृह अधिक्षकांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेशही विकास सिंह यांनी दिले आहेत. विकास सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावत या प्रकरणाचा तात्काळ अहवाल मागितला आहे. त्यासह बालगृहाच्या देखभालीसाठी दिनेश रावत यांची प्रभारी म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे.
निमोनियाने मृत्यू :राजकीय बालगृहातील चार चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या चिमुकल्यांचा मृत्यू निमोनियाने झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. सिव्हील रुग्णालयात मंगळवारी एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर बाकीच्या चिमुकल्यांनी 10 ते 12 फेब्रुवारीच्या दरम्यान शेवटचा श्वास घेतला. सिव्हील रुग्णालयात एका चिमुकल्यावर उपचार सुरू आहेत. सिव्हील रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर पी सिंह यांनी या मुलांना गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर या चिमुकल्यांना केजीएमयू कक्षात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर सतत लक्ष ठेऊन उपचार करत होते. चिमुकल्यांच्या उपचारामध्ये कोणताही हलगर्जीपणा करण्यात आला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.