दिल्ली/पाटणा: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे बैठक झाली. लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवस बाकी आहेत. असे असताना भाजपला टक्कर देण्यासाठी आणि विरोधी एकजूट मजबूत करण्यासाठी राजकीय पक्ष कोणतीही कसर सोडत नाहीत असे सध्या चित्र आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लखनऊमध्ये सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या बैठकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या रणनीतीवर दोन्ही नेत्यांकडून जोरदार चर्चा करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच अखिलेश यादव यांची आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट झाली होती.
लालूंच्या प्रकृतीचीही विचारपूस : मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. 20 मिनिटे अखिलेश यादव आरोग्यापासून राजकारणापर्यंत सर्व काही लालू यादव यांच्याकडे विचारपुस केली. अखिलेश यादव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर या बैठकीला 'कुशलक्षेम बैठक' असे संबोधले आहे. लालू यादव यांच्या भेटीदरम्यान त्यांनी लालूंच्या प्रकृतीचीही विचारपूस केली आणि यूपी-बिहारच्या राजकारणावरही चर्चा केली. किडनी प्रत्यारोपणानंतर लालू यादव यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे.