इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्सकडून अटक. इस्लामाबाद केर्टात हजेरी लावल्यानंतर इम्रान खान यांना ही अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपात त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. गेली अनेक दिवसांपासून त्यांना अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर त्यांना आज इस्लामाबाद येथून अटक करण्यात आली आहे.
न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात : इम्रान खान यांना पाक रेंजर्सनी अटक केल्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर इम्रान खान यांचे समर्थक आणि न्यायालयाबाहेर उपस्थित असलेल्या वकिलांना रेंजर्सकडून मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. इकडे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) इम्रान खान यांचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. पीटीआयने ट्विट केले की, पाकिस्तान रेंजर्सनी पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांचे अपहरण केले आहे.
लाचखोरीच्या आरोपाखाली न्यायालयात हजर : अटकेनंतर इम्रान खानला वैद्यकीय तपासणीसाठी इस्लामाबादहून रावळपिंडीला नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना निमलष्करी दलाने इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेरून अटक केली. इम्रान खान यांच्या पक्षाने ही माहिती दिली. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष खान यांना लाचखोरीच्या आरोपाखाली न्यायालयात हजर केले असता, त्यांना रेंजर्सनी ताब्यात घेतले. त्याचे वकील फैसल चौधरी यांनी ही माहिती दिली. माजी माहिती मंत्री आणि पीटीआयचे उपाध्यक्ष फवाद चौधरी म्हणाले की न्यायालय रेंजर्सच्या ताब्यात आहे आणि वकिलांचा छळ केला जात आहे असही त्यामध्ये म्हटले आहे.
इम्रानच्या अटकेनंतर पाकिस्तानात खळबळ : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी संपूर्ण पाकिस्तानात गोंधळ घातला. पीटीआय समर्थक आणि नेते ठिकठिकाणी टायर जाळून निषेध करत आहेत. इम्रान खानच्या अटकेपूर्वी रेंजर्सनी कोणतेही वॉरंट दाखवले नाही, असा आरोप पीटीआयने केला आहे. त्यांना बळजबरीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर डोळ्यांवर काळी पट्टी बांधून त्यांना व्हॅनमध्ये नेले असाही आरोप यावेळी करण्यात आला आहे.
हेही वाचा :Salman Khan death threat: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी: मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात लुकआउट नोटीस केली जारी