नवी दिल्ली - देशातील वातावरण निवडणुकामुळे चांगलेच तापलं आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच ( Assembly Elections in 5 States ) राज्यांच्या निवडणुका म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जणू सेमीफायनलच आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे. या राज्यात आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. पंजाबमध्ये येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यातच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ( Former PM Dr. Manmohan Singh Slams Govt ) या निवडणुकीत एन्ट्री मारल्याचे दिसून येत आहे. आज एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारचा राष्ट्रवाद खोटा असल्याचे ते म्हणाले. तसेच 'कमी बोललो, पण काम जास्त केले', असेही त्यांनी म्हटलं.
डॉ.सिंग यांनीही चीनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले. गेल्या एक वर्षापासून चिनी सैन्य भारताच्या भूमीवर ठाण मांडून बसले आहे. या सरकारचा संविधानावर विश्वास नाही. घटनात्मक संस्था सतत कमकुवत होत आहेत. सरकार केवळ देशातच नाही तर परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले.
वाढत्या महागाईने लोक त्रस्त -
सध्याची देशातील परिस्थिती चिंताजनक असून कोरोना काळातील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. महागाई आणि बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. तर दुसरीकडे 7 वर्षे सरकार चालवूनही केंद्र सरकार आपल्या चुका मान्य करत नसल्याचे दिसत आहे. आज लोकांना ज्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी ते देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत आहेत, असे मनमोहन सिंग यांनी म्हटलं.
मी बोललो कमी, पण काम जास्त केले -
पंतप्रधानपदाला एक वेगळी गरिमा असते. प्रत्येकवेळी इतिहासाला दोष देऊन तुमचे पाप कमी होत नाहीत. पंतप्रधान म्हणून कार्य बजावताना मी जास्त बोलण्याऐवजी कामाला प्राधान्य दिले. कधीच राजकीय फायद्यासाठी देशाचे विभाजन केले नाही. तसेच सत्य झाकण्याचाही कधीही प्रयत्न केला नाही, असे सिंग यांनी सांगितले.
शेजारील देशांसोबतचे संबंध बिघडले -
भारताच्या पवित्र भूमीवर गेल्या एक वर्षापासून चिनी सैन्य ठाण मांडून आहे. हे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेजारील देशांसोबतचे आपले संबंध बिघडले असून जुने मित्र आपल्या सोडत आहेत. बळजबरीने मिठी मारणे, दौरे करणे, निमंत्रण नसताना बिर्याणी खायला जाणे, या आशा गोष्टींमुळे देशाचे संबंध सुधरत नाहीत, हेही सरकारने समजून घेतले पाहिजे, अशा कडक शब्दात सिंग यांनी मोदींवर टीका केली.