मेरठ :कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण करने उत्तर प्रदेशातील माजी मंत्र्याला चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी न्यायालयाने माजी मंत्र्याला शिक्षा ठोठावली आहे. हाजी याकूब कुरेशी असे त्या न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या उत्तर प्रदेशातील माजी मंत्र्याचे नाव आहे. हाजी याकूब कुरेशीने 2011 मध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण केली होती. सध्या हाजी याकूब कुरेशी सोनभद्र कारागृहात कैद आहे.
मंत्र्याला थांबवल्याने पोलिसाला मारहाण :चाहन सिंग हे राज्य पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत होते. 17 मार्च 2011 ला राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या याकूब कुरेशीने पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन करत मारहाण केली होती. लिसाडी गेट पोलीस नियंत्रण कक्षात चाहन सिंग हे तैनात होते. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षाच्या आदेशानुसार हापूर स्टँड चौकात ड्युटी करत होते. त्याचवेळी एक जीप हुटर वाजवत जात होती. यावेळी चाहन सिंगने त्या जीपला थांबण्याचे संकेत दिले होते. दरम्यान मागून काळ्या रंगाच्या कारमधून याकूब कुरेशी तेथे पोहोचल्याने त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी मंत्री याकूब कुरेशीने गैरवर्तन करत चाहन सिंगला मारहाण केली. त्यांचा कर्तव्यावरील गणवेशही फाडला.
न्यायालयाच्या आदेशावरुन झाला गुन्हा दाखल :याकूब कुरेशीने पोलिसांसोबत मारहाण केल्यामुळे या घटनेत चाहन सिंग गंभीर जखमी झाले होते. जखमी चाहन यांना जसवंत राय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे चाहन सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून हाजी याकूब कुरेशीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चाहन सिंग यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी याकूब कुरेशीविरुद्ध कलम 323, 333, 504,506 अन्वये आरोपपत्र दाखल केले.