नवी दिल्ली :उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्समधील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने 28 एप्रिल रोजी साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावले आहे. सत्यपाल मलिक यांनी याबाबत वृत्तसंस्थाना माहिती दिली आहे. ते म्हणाले की, काही बाबी स्पष्ट करण्यासाठी त्यांना मध्य दिल्लीतील सीबीआयच्या अकबर रोड येथील अतिथीगृहात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
मलिक पुढे म्हणाले की, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना काही स्पष्टीकरण हवे आहे. ज्यासाठी त्यांना माझ्याकडून माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे. मी राजस्थानला जात आहे म्हणून मी त्यांना 27 ते 29 एप्रिलपर्यंतच्या तारखा दिल्या आहेत. जेव्हा मी सीबीआयला उपलब्ध होईल. मलिक यांनी पुढे सांगितले की, त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना 2018 मध्ये कंपनीचा करार रद्द केला होता.
या प्रकरणातील प्रथम माहिती अहवालात (FIR), CBI ने ट्रिनिटी रीइन्शुरन्स ब्रोकर्ससह रिलायन्स जनरल इन्शुरन्सला जम्मू आणि काश्मीर सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय विमा योजना आणण्याच्या कथित घोटाळ्यात आरोपी म्हणून नाव दिले आहे. मलिक यांनी विमा योजनेत फसवणुकीचा आरोप केला होता, त्यानंतर सीबीआयची कारवाई झाली.