नई दिल्ली -राजस्थानमधील उदयपूर येथे भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या कारणावरून कन्हैया लाल नावाच्या शिंपीची मंगळवारी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी कन्हैयालालला यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ( Former Delhi BJP Media In Charge Naveen Jindal ) आता दिल्ली भाजपचे माजी मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदाल यांनाही अशाच प्रकारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
नवीन कुमार जिंदाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, आज सकाळी 6.43 च्या सुमारास मला तीन ईमेल आले, ज्यात उदयपूरमध्ये कन्हैया लालचा गळा कापल्याचा व्हिडिओ जोडला आहे. मला आणि माझ्या कुटुंबालाही अशाप्रकारची धमकी देण्यात आली आहे. नवीन कुमार यांना पाठवलेल्या मेलमध्ये आता तुझी पाळी आहे, अशी धमकी देण्यात आली आहे. लवकरच मी तुझी मान कापून टाकीन असही यामध्ये म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आहे.