पणजी -गोवा काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो यांनी काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहाला कंटाळून आमदारकीचा व काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस आमदारांनी आत्महत्या न करता वेगळा मार्ग धरावा, असा टोला त्यांनी लगावला आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार लुझिनो फलेरो यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा सभापतींकडे सुपूर्द केला. 2017 पासून काँग्रेस पक्षात होणारी घुसमटीमुळे काँग्रेसच्या सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनाम्याचे कारण असल्याचे फलेरो यांनी सांगितले.
हेही वाचा-बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे तिघे राजापूरमध्ये जेरबंद; वनविभागाची कारवाई
२०१७ पासून काँग्रेस पक्षात माझा छळ सुरू- फलेरो
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे १७ आमदार निवडून आणण्यात फलेरो यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याचवेळी त्यांचे ३ समर्थक आमदारही निवडून आले होते, त्यावेळी आपण दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे दावा करण्याचा आग्रह धरला होता, मात्र काँग्रेसने आपल्याला विरोध करत राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हापासून आपला काँग्रेस पक्षात दुय्यम भूमिका देत छळ सुरू झाला. परंतु आपण आजपर्यंत साडेचार वर्षे निमुटपणे सगळे सहन केले. मात्र, आता हे सगळे सहन करण्यापलीकडे गेले आहे. मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा देत ममता बॅनर्जींसोबत जात असल्याचे त्यांनी सांगितले.