लखनौ : उत्तर प्रदेशात माफिया राज संपवण्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भर दिला आहे. अतिक अहमदनंतर आता गुंड मुख्तार अंसारी निशाण्यावर असून मुख्तार अंसारीला न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. त्यासह न्यायालयाने मुख्तार अंसारीला 5 लाख रुपयाचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील गुंडाचे कंबरडे मोडण्याचे धोरण सुरूच ठेवल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.
कोण आहे मुख्तार अंसारी :मुख्तार अंसारी हा उत्तर प्रदेशातील माफिया आहे. मुख्तार अंसारीला राजकारणाचा मोठा वारसा लाभला आहे. मुख्तार अंसारीचे आजोबा डॉ मुख्तार अहमद अंसारी हे महात्मा गांधींजींच्या खूप जवळचे असल्याचे मानले जाते. राजकारणात आल्यानंतर मुख्तार अंसारीही आमदार झाला आहे. मात्र कृष्णानंद राय आणि नंदकिशोर रुंगटा यांच्या खुनाच्या गुन्ह्यात मुख्तार अंसारीला अटक करण्यात आली होती. मुख्तार अंसारीला साक्षिदार फितूर झाल्यामुळे न्यायालयाने त्याची सुटका केली होती. मुख्तार अंसारीवर तब्बल 61 गुन्हे दाखल आहेत. महू, वाराणसी, आजमगढ, गाजीपूर आदी परिसरात मुख्तार अंसारीची मोठी दहशत पसरली आहे.