नवी दिल्ली -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे काँग्रेसचे केरळमधील मोठे नेते व माजी खासदार पी.सी. चाको यांनी आज दिल्लीत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीची ताकद वाढली -
केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मात्र काँग्रेसमधील नेत्यांनी त्यांच्या जाण्याने फार काही फरक पडणार नाही. कारण त्यांना फार जनाधार प्राप्त नाही. ते केवळ ख्रिश्चन समुदायाच्या एका गटाचे नेतृत्व करतात, असे म्हटले होते. चाको हे काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, असे सांगण्यात येत होते. त्यानुसार आज त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देताना चाको यांच्या पक्षप्रवेशामुळे मी समाधानी आणि आनंदी असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.