रामगड(मध्य प्रदेश) : भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले असेल, परंतु याची मुहूर्तमेढ 1857 मध्ये रोवली गेली होती. याच स्वातंत्र्याच्या लढ्यात मोलाचं योगदान दिलं आहे राणी अवंतीबाई यांनी. त्यांचा उठाव ब्रिटिशांनी चिरडला. मात्र त्यांच्या लढ्याने भारतीयांना हा संदेश दिला, की ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य नक्कीच मावळू शकतो. आज महिलांना समानतेसाठी झगडावं लागतंय. मात्र मंडला जिल्ह्यात राणी अवंतीबाईंचं नाव मोठ्या आदरानं आणि अभिमानानं घेतलं जातं.
सासरी मिळाले अवंतीबाई हे नाव
अवंतीबाईंचा जन्म 16 ऑगस्ट 1831 रोजी सिवनी जिल्ह्यातील मंकेहाडी गावातील जमीनदार राव जुझार सिंह यांच्या घरात झाला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना अंतोबाई असं नाव दिलं. त्या तलवारबाजी, हस्तकला, तिरंदाजी, लष्करी रणनीती, मुत्सद्दीपणा आणि राज्यकारभारात पारंगत होत्या. 1848 मध्ये त्यांचा विवाह रामगढ येथील राजघराण्यात झाला. जिथे त्यांना अवंतीबाई असं नवं नाव मिळालं. इतिहासकार नरेश ज्योतिषी यांनी सांगितल्यानुसार, राणीचे माहेरचे नाव अंतोबाई होते. सासरी त्यांना अवंतीबाई म्हणून ओळखले जायचे. रामगडच्या इतिहासात अवंतीबाई असेच त्यांचे नाव नोंदवले गेले. त्यांच्या सासऱ्याचे नाव लक्ष्मण सिंह होते. विक्रमादित्य सिंह हा राजाचा मुलगा होता.
विक्रमादित्यांच्या मृत्यूनंतर राणींनी घेतली राज्याची धुरा
1851 साली, रामगडचे राजे आणि अवंतीबाई लोधी यांचे सासरे लक्ष्मण सिंह यांचे निधन झाले. आणि राजकुमार विक्रमादित्य सिंह हे रामगडचे राजे झाले. परंतु काही वर्षांनंतर नवीन राजांना अस्वस्थता जाणवू लागली. विक्रमादित्य यांची दोन्ही मुलं, अमन सिंह आणि शेरसिंह हे तेव्हा लहान असल्याने राणीने राज्याची धुरा आपल्या हाती घेतली. राज्य जोडण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी अवंतीबाईंना शासक म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आणि रामगढवर कुख्यात "लॅप्टेनचा सिद्धांत" लागू करत स्वतःचा प्रशासक नेमला. विक्रमादित्य सिंह यांच्या मृत्यूनंतर राणींसमोर एक समस्या होती. त्यांना दोन मुलं होती पण दोघंही खूप लहान होते. लॉर्ड डलहौसीचे धोरण राज्य पूर्णपणे बळकावण्याचे होते. दिल्लीत बसल्यावर त्याला राज्य बळकावण्याची इच्छा होती. म्हणून त्याने कोर्ट ऑफ वॉर्ड्स लागू केल्याचे इतिहासकार नरेश ज्योतिषी म्हणाले.