नवी दिल्ली Passenger Assaults Indigo Pilot : दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. त्यातच दाट धुक्यामुळं अनेक विमानं उशिरानं उड्डाण करत आहेत. दरम्यान, इंडिगोच्या विमानात उड्डाणाला उशीर झाल्यामुळं प्रवाशानं संतापून थेट पायलटलाच धक्काबुक्की केली. यानंतर विमानमध्ये एकच गोंधळ उडाला. हे धक्कादायक प्रकरण दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलं आहे.
नेमकं काय घडलं : इंडिगोच्या विमानाला उशीर झाल्यामुळं वैतागलेल्या एका प्रवाशानं वैमानिकाला धक्काबुक्की केल्याचं समोर आलंय. धुक्यामुळं उड्डाणाला विलंब होत होता. मात्र, प्रवाशांना योग्य माहिती दिली जात नव्हती. याप्रकरणी आयजीआय पोलिसांकडं तक्रार करण्यात आलीय. आयजीआय पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केलाय. आम्ही आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करु, असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात एव्हिएशन सिक्युरिटी एजन्सीनं तपास सुरु केला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी 7 वाजता घडली असून हे विमान दिल्लीहून गोव्याला जात होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिलीय.