रायपूर : होळीच्या दिवशी गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या पाच नक्षलवाद्यांची ओळख आता पटली असून, यांमध्ये तब्बल २५ लाखांचे बक्षीस असणारा कुख्यात नक्षलवादी भास्कर हिचामीचाही समावेश आहे. अन्य दोन नक्षलवाद्यांवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तर आणखी दोघांवर प्रत्येकी दोन लाखांचे बक्षीस होते. या पाच नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचाही समावेश होता.
मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची माहिती..
भास्कर हिचामी..
भास्कर हिचामी उर्फ रुषी रावजी उर्फ पवन हा ४६ वर्षांचा होता. गडचिरोलीमध्ये डीकेएसझेडसी (दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी)चा सदस्य म्हणून काम करत होता. त्याच्याविरुद्ध १५५ गुन्हे दाखल करण्यात आली आहे. यांमध्ये हत्येचे ४१, पोलिसांवर हल्ला करण्याचे ७८, डाका टाकल्याचा १, जाळपोळीचे १६ तर अन्य गंभीर अपराधांचे १९ प्रकरणांचा समावेश आहे. त्याच्यावर एकूण २५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
सुखदेव बुद्धेसिंग नेताम..
नक्षलवादी राजू उर्फ सुखदेव बुद्धेसिंग नेतामचे वय ३२ वर्ष होते. तो टिपागडमधील एलओएसमध्ये डेप्युटी कमांडर पदावर काम करत होता. त्याच्याविरुद्ध एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. यांमध्ये हत्येचे पाच, पोलिसांवर हल्ल्याचे तीन, जाळपोळीचे तीन, डाक्याचा एक आणि इतर गंभीर आरोपांचा समावेश आहे. याच्यावर एकूण १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.