बेंगळुरू -बादराहल्ली परिसरात राहाणाऱ्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाच्या कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी कुजलेल्या अवस्थेत मिळाले आहेत. कुटुंबातील सततच्या भांडणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये संपादक शंकर यांची पत्नी भारती (50), मुलगी सिंचन (33), सिंधुराणी (30), मुलगा मधु सागर (27) आणि 9 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे.
३ वर्षांचे बाळ जिवंत, उपचार सुरू
शंकर यांच्या घरात सतत भांडण होत असल्याची माहिती पुढे आली आहे. 9 महिन्यांच्या बाळाची हत्या केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने त्यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी आत्महत्या केली असल्याचीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, त्यांच्या घरात एकूण सहा जण राहत होते. यामध्ये केवळ 3 वर्षाचे बाळ जिवंत आहे. हे बाळ 5 दिवसांपासून घरातच होते. त्यामुळे अन्न-पाण्याशिवाय अशक्त झालेल्या बाळावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - एटीएसची कारवाई : झाकीरने जानला दिला होता स्फोटकांची डिलिव्हरी घेण्याचा टास्क