नेल्लोर (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील तोडेरू शांतीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली. गावच्या तलावात बोट बुडाल्याने मौजमजेसाठी गेलेल्या 10 तरुणांपैकी सहाजण बेपत्ता झाले आहेत. तर चार तरुण किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले आहेत. रविवारी संध्याकाळपासून तेथे जोरदार वारे वाहत आहेत. सोमवारी दुपारपर्यंत पाच मृतदेह सापडले आहेत.
चार जण वाचले : नेल्लोर जिल्ह्यातील टोडेरू, पोदालकुरू मंडल येथे ही दुर्घटना घडली. रविवारी सायंकाळी गावातील तलावात बोटीत मासेमारीसाठी गेलेले 10 युवक बोट उलटल्याने पाण्यात पडले. यातील चार जण पोहून किनाऱ्यावर आले तर मन्नूर कल्याण (३०), अली श्रीनाथ (१६), पती सुरेंद्र (१६), पमुजुला बालाजी (२०), बट्टा रघु (२५) आणि छल्ला प्रशांतकुमार (२६) हे हरवले होते. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. सोमवारी दुपारपर्यंत मन्नूर कल्याण (30), अली श्रीनाथ (16), पमुजुला बालाजी (20), बट्टा रघु (25) आणि छल्ला प्रशांतकुमार (26) यांचे मृतदेह सापडले होते. सुरेंद्र या बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे.
अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांसह बुडणाऱ्यांचा शोध सुरू केला. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने अंधारामुळे बचावाचे कार्य खोळंबले होते. मध्यरात्रीपर्यंत तरुणांचा ठावठिकाणा लागला नव्हता. नेल्लोरचे जिल्हाधिकारी चक्रधर बाबू आणि एसपी विजय राव हे मदतकार्यावर निरीक्षण ठेऊन आहेत. रविवारी रात्रीपासून एसपी विजया राव यांनी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसोबत हजर राहून त्यांना सूचना दिल्या.