तिरुवअनंतपुरम :अनन्या कुमारी अॅलेक्स, या केरळ विधानसभा लढवणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला आहे. आपल्याच पक्षामधून आपल्याला लिंगभेद आणि लैंगिक छळ अशा गोष्टींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप या अनन्याने केला आहे.
मूळच्या वेंगारा येथील असलेल्या अनन्या कुमारी अलेक्स, मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार होत्या. डेमोक्रॅटिक सोशल जस्टिस पक्षाकडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वीच आपण पक्षातील काही नेत्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
"पक्षातील नेत्यांनी केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी उमेदवार म्हणून माझं नाव पुढे केलं होतं. त्यामागे त्यांचा काही स्वार्थ होता. त्यांनी मला दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराविषयी चुकीच्या गोष्टी बोलायला सांगितल, तसेच सध्याच्या सरकारविरोधात बोलायला सांगितलं. यासोबतच प्रचारावेळी 'परदा' किंवा 'बुरखा' घालण्याचे आदेश मला देण्यात आले. मी या सर्वाला नकार दिल्यानंतर, पक्षातील नेत्यांनी माझं करिअर संपवण्याच्या धमक्या मला दिल्या"; असे आरोप अनन्या यांनी केले आहेत.
केरळ निवडणूक -
केरळ विधानसभेत 140 जागांसाठी 6 एप्रिल 2021 मतदान होईल. तर निवडणुकीचे निकाल 2 मे 2021 ला लागतील. राज्याची ही 15 वी विधानसभा निवडणूक असणार आहे. 2021 मध्ये 140 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.