अहमदाबाद - देशात कोरोनाचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरुद्घ युद्ध सुरू असतानाच ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता अधिक वाढली आहे. कोरोनामुक्त झाल्यावर ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचा सामना रुग्णाला करावा लागत आहे. गुजरातमध्ये म्युकोरमायकोसिसची लागण एका 13 वर्षीय मुलाला झाली आहे.
अहमदाबादमधील एका 13 वर्षीय मुलाला म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित मुलाला यापूर्वी कोरोना झाला होता. दरम्यान त्यांच्या आईचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुलाला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण आहे.
लवकर उपचार झाले तर हा आजार बरा होतो -
कोरोनानंतर मधुमेह असणाऱ्यांना या आजाराची लागण होते. यात नाकात व डोळ्यांमध्ये बुरशी तयार होऊन डोळे लाल होतात. सुरुवातीच्या काळात यावर उपचार झाले तर हा आजार बरा होतो. परंतु, दुर्लक्ष केल्यास या आजाराची गंभीरता वाढत जाऊन ही बुरशी मेंदूपर्यंत पोहोचते व रुग्णाची परिस्थिती गंभीर होत जाते. त्यामुळे कोरोनानंतर डोळे व नाकासंबंधी काही तक्रारी आढळल्यास तात्काळ संबंधित तज्ज्ञांना दाखवणे गरजेचे आहे.