चिल्का (ओडिशा) : भारतीय नौदलाच्या आयएनएस चिल्का येथे मंगळवारी 2,585 अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची पासिंग आऊट परेड पार पडली. चार महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे अग्निवीर आता सेवेसाठी सज्ज झाले आहेत. नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी पासिंग आऊट परेडमध्ये नवीन भरती झालेल्या जवानांची सलामी घेतली. सूर्यास्तानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सशस्त्र दलात पहिल्यांदाच सूर्यास्तानंतर पासिंग आऊट परेड घेण्यात आली. पारंपरिकपणे, पासिंग आऊट परेड सकाळी आयोजित केली जाते.
खुशी पठानिया सर्वोत्कृष्ट महिला अग्निवीर :आयएनएस चिल्का येथे अग्निवीरच्या पहिल्या पासिंग आऊट परेडमध्ये खुशी पठानियाला सर्वोत्कृष्ट महिला अग्निवीर म्हणून जनरल बिपिन रावत करंडक प्रदान करण्यात आला. 19 वर्षीय खुशी पठानिया मूळची पठाणकोटची आहे. तिचे आजोबा सुभेदार मेजर पदावरून निवृत्त झाले आहेत. तर तिचे वडील शेतकरी आहेत. आयएनएस चिल्का ही भारतीय नौदलाच्या अग्निशमन दलाची प्रमुख मूलभूत प्रशिक्षण संस्था आहे. ही संस्था सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रणालीद्वारे भर्तीसाठी प्रारंभिक प्रशिक्षण प्रदान करते.