पणजी (गोवा) - राज्यातील सत्तरी तालुक्यात वनखाते, म्हादई अभयारण्य व नागरिकांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आला. यावेळी म्हादई अभयारण्याचे वनअधिकारी नारायण प्रभुदेसाई यांनी थेट आपल्या पिस्तुलातून हवेत तीन गोळ्या फायर केल्याचा व्हिडिओ सध्या गोव्यात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जेवढा गंभीर आहे, तेवढाच येथील प्रश्न देखील गंभीर झाला आहे. सरकारने या प्रकरणी लक्ष घातले असले तरी गोळीबार करण्याइतपत या ठिकाणी नेमके काय घडले होते? यासंदर्भात आता दोन्ही पक्षाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत.
गोव्याच्या म्हादई अभयारण्यात वन अधिकाऱ्यांचा हवेत गोळीबार - वृक्षतोड केल्याने गोळीबार
काजरेधाट येथे नारायण प्रभुदेसाई यांना झाडांची कत्तल केल्याचे दिसून आले. या दिवशी काजरेधाट येथील महिला सरस्वती गावडे या घर साकारणीचे (घरशिवणी) काम करताना दिसल्या. त्यावेळी प्रभुदेसाईंनी सदर महिलेला घर शिवणीसाठी झाडांची कत्तल का केलीस, अशी विचारणा करीत त्या ठिकाणी असलेली कोयता व अन्य साहित्य जप्त केले होते.
म्हादई अभयारण्यात नेमका काय प्रकार घडला होता ?
सत्तरी तालुक्यात वनखाते, म्हादई अभयारण्य व नागरिकांमध्ये जमीन मालकी विषयावरून गेल्या अनेक वर्षांपासून तणावाची स्थिती आहे. रविवारी पुन्हा एकदा हा तणाव दिसून आला. याला कारण म्हणजे सावर्डे पंचायत क्षेत्रातील काजरेधाट , बंदीरवाडा या मार्गे वाळपई म्हादई अभयारण्याचे वनअधिकारी नारायण प्रभुदेसाई व खात्याच्या वरिष्ठ अधिकारी डी. सी. एफ तेजस्वीनी या बुधवारी (१२ मे) कृष्णापूर येथे जात होत्या. त्यावेळी काजरेधाट येथे नारायण प्रभुदेसाई यांना झाडांची कत्तल केल्याचे दिसून आले. या दिवशी काजरेधाट येथील महिला सरस्वती गावडे या घर साकारणीचे (घरशिवणी) काम करताना दिसल्या. त्यावेळी प्रभुदेसाईंनी सदर महिलेला घर शिवणीसाठी झाडांची कत्तल का केलीस, अशी विचारणा करीत त्या ठिकाणी असलेली कोयता व अन्य साहित्य जप्त केले होते.
या घटनेची माहिती सरस्वती गावडे यांनी गावकऱ्यांना दिली. या प्रकारामुळे लोक संतप्त झाले. त्यांनी काजरेधाट रस्त्यावर वनअधिकारी पुन्हा माघारी येण्याची ठाण मांडून वाट बघत बसले. दुपारी वनअधिकारी कृष्णापूरहून माघारी येत असताना लोकांनी त्यांची वाहने अडवून सकाळच्या प्रकाराबाबत जाब विचारला. उपस्थितांपैकी काहींनी वाहनाची चावी काढून घेतली. लोकांनी आक्रमक पावित्रा घेतल्याचे पाहून नारायण प्रभुदेसाई यांनी तीनवेळा हवेत गोळीबार केला, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्थानिक ग्रामस्थांच म्हणणं नेमकं काय आहे?
सरस्वती गावडे म्हणाल्या, आपण गोठाघर शिवणीचे काम करीत होते. त्यावेळी म्हादई वनखात्याचे नारायण प्रभुदेसाई यांनी येऊन आपणाकडील साहित्य जप्त केले. हरिश्चंद्र गावस म्हणाले, म्हादईचे नारायण प्रभूदेसाई हे नेहमीच पिस्तूल घेऊन फिरत असतात. बुधवारी त्यांनी लोकांसमोरच हवेत तीनेवळा गोळीबार करून लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी लोक मात्र हा प्रकार पाहून भयभीत झाले. वनखात्याला आम्ही गावात बंदी घालून देखील म्हादई वनखाते आम्हाला करंझोळ, कुमठळ, काजरेधाट, बंदीरवाडा येथील लोकांना त्रास करीत आहेत. अशी माहिती यावेळी स्थानिकांनी दिली आहे.
स्वत:चे रक्षण करण्यासाठी मला नाईलाजास्तव हवेत गोळीबार करावा लागला
वनअधिकारी नारायण प्रभुदेसाई म्हणाले, आपण व वरिष्ठ अधिकारी तेजस्वीनी कृष्णापूरला जात असताना वाटेत काजरेधाटात झाडे कत्तल केलेली दिसून आली. याबाबत आपण महिलेला विचारले होते. झाडे कत्तलीचे साहित्य जप्त केले होते. दुपारी माघारी येताना लोकांनी बेकायदेशीरपणे रस्ता अडवून आम्हाला वाहनासह रोखून धरले. म्हादई अभयारण्य जतनाचे कर्तव्य आम्ही निभावत आहोत, असे असताना लोकांकडून चुकीच्या पद्धतीने काम केले जात आहे. दुपारी आम्हाला अडविल्यानंतर स्वत:चे रक्षण करण्यासाठी मला नाईलाजास्तव हवेत गोळीबार करावा लागला. स्वत:च्या बचावासाठी तो आम्हाला अधिकार दिलेला आहे. या घटनेची माहिती आम्ही सरकारी दरबारी देणार आहोत, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. दरम्यान वाळपई पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.