पानीपत - शहरातील स्पिनिंग मिलमध्ये मंगळवारी आग लागल्याने खळबळ उडाली. या भीषण आगीत संपूर्ण मिल जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. मात्र अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठी अडचण झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवताना तिरंगा झेंडा काढतानाचा जवानांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे नागरिकांची छाती अभिमानाने भरुन येत आहे.
तिरंग्यासाठी जवानाने लावली बाजी :या मिलच्या इमारतीवर भारताचा तिरंगा डौलाने फडकत होता. मात्र इमारतीला आग लागल्यामुळे झेंड्याला बाधा पोहोचली असती. आग हळूहळू सगळ्या इमारतीत पसरली होती. अग्निशमन दलाचा जवान सुनिल जीवाची बाजी लावत आगीने घेरलेल्या इमारतीवर चढले. यावेळी त्यांनी तिरंगा झेंडा सुरतक्षितपणे उतरवला. तिरंगा झेंडा उतरवतानाचा त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल माध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे.
डिझेल मशीनमुळे लागली आग :पानीपतच्या भारतनगरमध्ये असलेल्या स्पिनींग मिलमध्ये डिझेल मशीनमुळे आग लागली. या आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. त्यामुळे पाहता पाहता पूर्ण मिल जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या गाड्यांना येण्यात अडचण असल्याने जवानांना चांगलीच कसरत करावी लागली. मात्र तरीही जीवाची बाजी लावत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.