हैदराबाद -सिकंदराबाद येथील एका लॉजला लागलेल्या आगीत दाट धुरामुळे गुदमरून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सिकंदराबादमध्ये सोमवारी रात्री ही भीषण आग लागली (Secunderabad Lodge Fire) होती. येथील रुबी लॉजमध्ये थांबलेल्या आठ पर्यटकांचा दाट धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला (Eight People Died) आहे. घटनास्थळी अग्निशामन दल दाखल झाले होते. यातील तिघांची ओळख पटली असून, इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
सिकंदराबाद येथे लागलेली आग यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यांचे वय 35 ते 40 वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती आहे. तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त - तेलंगणातील सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. जखमी लवकर बरे होवोत. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू - विजयवाडा येथील हरीश, चेन्नई येथील सीतारामन आणि दिल्लीतील वीतेंद्र यांचा मृत्यू झाला आहे. तर इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पाच मजली इमारतीच्या तळघरात असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या शोरूमला आग लागली. शोरूमच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लॉजच्या खोल्यांमध्ये आणि आवारात धुराचे लोट पसरले होते. या धुरामुळे लोक बेशुद्ध पडले होते आणि यातच सात जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना गांधी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या शोरूमला लागली होती आग - सिकंदराबाद येथील पासपोर्ट कार्यालयाजवळ रुबी लक्झरी प्राइड नावाची पाच मजली इमारत आहे. रुबी इलेक्ट्रिक वाहनांचे शोरूम तळमजल्यावर आहे. उर्वरित चार मजल्यांवर हॉटेल आणि लॉज आहे. सोमवारी रात्री 9.40 च्या सुमारास तळमजल्यावर आग लागली. उष्णतेमुळे शोरूममधील इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे आग वाढत गेली. ती आग वाहनांपर्यंत पसरल्याने मोठ्या प्रमाणात स्फोट झाला, अशी माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
सात जणांचा मृत्यू - कर्मचारी म्हणाले की, आग आणि धूर जिन्यांमधून वरच्या मजल्यावर पसरला. याशिवाय वाहने आणि बॅटरींमुळे दाट धूर निघत होता. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. मंत्री तलासनी श्रीनिवास यादव, महमूद अली, हैदराबादचे सीपी सीव्ही आनंद यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलीस आयुक्तांनी दिलेली माहिती -सिकंदराबाद येथील हॉटेलला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तळमजल्यावरील इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग लागली, त्यातून धुराचे लोट पहिल्या आणि दुस-या मजल्यावर राहणाऱ्या लोकांपर्यंत गेले आणि यात त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती हैदराबादचे आयुक्त सीव्ही आनंद यांनी दिली आहे. ते म्हणाले की, उर्वरित लोकांनी इमारतीवरून उड्या मारल्या आणि त्यांना स्थानिकांनी वाचवले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते, अशी माहिती सीव्ही आनंद यांनी दिली.